Weird Job Offer: फक्त लाईट बल्ब बदलण्यासाठी 1 कोटी रुपये पगार मिळणार... करणार का नोकरी? ही ऑफर ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण सध्या अशीच जॉब ऑफर सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लोक फक्त ही ऑफर ऐकून आश्चर्यच व्यक्त करतायत, पण एवढा भरघोस पराग मिळूनही या नोकरीसाठी कोणीच तयार होत नाहीये. कारणंही तसंच आहे बरं का... लाईट बल्ब बदलणं एवढंच काम आहे, हे अगदी खरं आहे. पण हा लाईट बल्ब बदलण्यासाठी तब्बल 600 मीटर उंचीच्या टॉवरवर चढावं लागणार आहे. काम शुल्लक वाटलं तरीही धोक्याचं असल्यामुळे अनेकजण नोकरी करण्यास नकार देत आहेत. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या नोकरीच्या जाहिरातीनुसार, ही नोकरी टॉवर लँटर्न चेंजरची आहे, हे काम अमेरिकेतील साऊथ डकोटा येथे आहे. जी व्यक्ती ही नोकरी स्विकारेल त्याला तब्बल 600 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या सिग्नल टॉवरवर चढून त्याचा बल्ब बदलावा लागेल.


हे टॉवर सामान्य टॉवर्सपेक्षा थोडे वेगळे आहेत. जसजसं हा टॉवर वर जातो, तसतसा त्याची रुंदी कमी होत जाते. त्यांच्या माथ्यावर पोहोचणं आणि बल्ब बदलण्यासाठी तिथं उभं राहणं हे खरंच अत्यंत कठीण काम आहे. वर चढण्यासाठी सुरक्षितता म्हणून फक्त दोरीचा म्हणजेच, सेफ्टी केबलचा वापर केला जातो. 


नोकरी मिळवण्यासाठी आहेत काही अटी


मिरर यूकेनं दिलेल्या वृत्तानुसार, या नोकरीची सर्वात आवश्यक अट म्हणजे अर्जदाराला उंचीची भीती वाटू नये. तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. एक वर्षापेक्षा कमी अनुभव असलेल्या व्यक्तीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. वेतन अनुभवावर आधारित असेल. पण सुरुवातीचे उत्पन्न देखील कोणत्याही सामान्य व्यक्तीपेक्षा नक्कीच खूप जास्त असेल.


काम किती अवघड आहे?


जमिनीपासून 600 मीटरवर असलेल्या टॉवरच्या माथ्यावर चढण्यासाठी सुमारे 3 तास लागतात, असं सांगितलं जात आहे. चढायला तीन तास आणि उतरायलाही तेवढाच वेळ लागेल. म्हणजे काम 6-7 तासांचं असेल. याशिवाय टॉवरच्या वरच्या बाजूला 100 किमी/तास वेगानं वारे वाहत असतात, ज्यामुळे या टॉवरवर चढणं आणखीनच आव्हानात्मक होतं. 


हे काम करणार्‍या व्यक्तीला 100000 पौंड (सुमारे 1 कोटी रुपये) वार्षिक पॅकेज मिळेल. टॉवरचा बल्ब दर 6 महिन्यांत एकदा किंवा दोनदा बदलावा लागतो. महत्त्वाचं म्हणजे, या कामासाठी बल्ब बदलणाऱ्या व्यक्तीच्या मदत दुसरं कोणीही करू शकणार नाही. टॉवरवर चढून हे काम त्या व्यक्तीला एकट्यानं करावं लागेल.


सोशल मीडियावर विचित्र नोकरीची जाहिरात चर्चेत  


सोशल मीडियावर या नोकरीच्या जाहिरातीचीच चर्चा आहे. मात्र, मोठा पगार असूनही अर्जदारांची संख्या खूपच कमी आहे. कारण हे काम अतिशय जोखमीचं आहे. सर्वप्रथम, ही जाहिरात Science8888 नावाच्या टिकटॉक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती, जी आतापर्यंत लाखो वेळा पाहिली गेली आहे. जाहिरातीच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उंच टॉवरवर चढताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'प्रत्येकजण हे करू शकत नाही.' दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या नोकरीच्या ऑफरबाबत कोणत्याही कंपनीकडून पुष्टी मिळू शकलेली नाही.