Jobs in 2026: 2026 वर्षात भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. स्टाफिंग सेवा देणाऱ्या टीमलीज (TeamLease) या संस्थेच्या अहवालानुसार, 2026 मध्ये देशभरात 10 ते 12 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये अंदाजे 8 ते 10 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या, त्या तुलनेत ही वाढ लक्षणीय ठरणार आहे.

ही नोकरभरती केवळ संख्यात्मक नसून, विविधता, समावेशकता आणि नव्या कौशल्यांवर आधारित असेल, असे संकेत एअरनस्ट अ‍ॅण्ड यंग (EY), गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, डियाजिओ आणि टाटा मोटर्ससारख्या नामांकित कंपन्यांच्या एचआर प्रमुखांनी दिले आहेत.

EY India कडून 15 हजारांपर्यंत भरती

EY India आपल्या आर्थिक वर्ष 2026 (जून 2026 अखेर) मध्ये 14 ते 15 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. EY India च्या मुख्य मानव संसाधन अधिकारी आर्ती दुआ यांनी सांगितले की, “कॅम्पस रिक्रूटमेंट हा EY साठी नेहमीच भरतीचा महत्त्वाचा आधार राहिला आहे आणि पुढील काळातही तो केंद्रस्थानी असेल.”

डियाजिओचा नव्या कौशल्यांवर भर

डियाजिओच्या भारतीय युनिटकडून डिजिटल स्किल्स, सप्लाय चेन विस्तार आणि महिला प्रतिनिधित्व वाढवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. बदलत्या व्यवसाय गरजांनुसार नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण आणि भरती ही कंपनीची प्रमुख दिशा असेल.

टाटा मोटर्समध्ये हायटेक क्षेत्रात संधी

टाटा मोटर्सकडून भरती प्रामुख्याने

  • बॅटरी टेक्नॉलॉजी
  • सॉफ्टवेअर-डिफाइन्ड व्हेईकल्स
  • हायड्रोजन इंधन
  • अभियांत्रिकी आणि संशोधन (R&D)

या क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. कंपनीचे CHRO सीताराम कांडी यांनी सांगितले की, भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित संधींमुळे भरती धोरण ठरणार आहे.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचा समावेशकतेवर भर

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी समावेशकतेला प्राधान्य देत आहे. सध्या 31 टक्के असलेले

  • महिला (cis-women)
  • दिव्यांग
  • LGBTIQA+ समुदायाचे प्रतिनिधित्व
  • आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 33 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.

मोतीलाल ओसवालमध्ये सर्व विभागांत भरती

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसकडून

  • टेक्नॉलॉजी
  • डेटा सायन्स
  • एआय सपोर्ट फंक्शन्स

सह सर्व व्यवसाय विभागांत नवीन तसेच रिप्लेसमेंट भरती केली जाणार आहे. ग्रुप CHRO निरेन श्रीवास्तव यांनी सांगितले की, कंपनी महिला नेतृत्वाचे प्रमाण वाढवण्यावरही भर देत आहे.

विविधता आणि समावेशकतेकडे कॉर्पोरेट भारताचा कल

एकूणच, 2026 मध्ये भारतीय कंपन्यांमध्ये केवळ रोजगारनिर्मितीच नव्हे, तर विविधता, समान संधी आणि भविष्यातील कौशल्यांवर आधारित भरती हा ठळक ट्रेंड पाहायला मिळणार आहे, असे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा 

Maharashtra Police Bharati 2025 : कर हर मैदान फतेह! पोलीस भरतीसाठी तगडी स्पर्धा, 15 हजार पदांसाठी राज्यभरातून लाखो अर्ज; नवी अपडेट आली समोर