चंद्रपूर : बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर (CDCC Bank Recruitment) या बँकेत सध्या लिपीक आणि शिपाई पदांची भरती सुरु आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेत एकूण 358 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये 261 जागा या लिपीक पदासाठी असतील. तर, 97 जागा शिपाई पदासाठी असतील. 


चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरीसाठी ज्यांना अर्ज दाखल करायचे आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागतील. बँकेकडून 261 लिपीक आणि 97 शिपाई पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया  ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेव्दारे राबवली जाणार आहे.  


बँकेनं या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. लिपीक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय वाणिज्य शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील लिपिक/वरिष्ठ श्रेणीत काम करण्याचा व्यावहारिक अनुभव ज्या उमेदवारांना असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टायपिंग, शॉर्टहँड चाचणी उत्तीर्ण उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल.तर, शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लिपीक पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 ते 38 वर्ष  आणि शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 38 दरम्यान असावं. 


ऑनलाईन अर्ज कधी दाखल करायचे?


चंद्रपूर जिल्हा बँक भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या https://www.cdccrecruitment.in/home या भरती प्रकियेच्या वेबसाईटवर अर्ज सादर करावे लागतील. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 8 ऑक्टोबर 2024 सकाळी 11.00 ते 19 ऑक्टोबर 2024 रात्री 12.00 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना 560 रुपये शुल्क भरावं लागेल. 


पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सदर फॉर्मस (अर्ज)आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. लिपीक आणि शिपाई भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील,इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.


दरम्यान,ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्हा बँकेनं परीक्षेचं आयोजन करण्यासाठी संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. साधारणपणे 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान या परीक्षा आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध जिल्हा बँकांकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 


इतर बातम्या :