मुंबई : मुंबई महापालिकेतील कर निर्धारण आणि संकलन खात्याच्या आस्थापनेवर निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं पात्र उमेदवारांकडून या संदर्भात अर्ज मागवले आहेत. निरीक्षक या पदाच्या 178 जागांसाठी अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच आवाहन करण्यात आलं आहे. निरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील दिला जाणार आहे.
मुंबई महापालिकेनं करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील निरीक्षक या पदाच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले असून परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
निरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 29200-92300 या वेतनश्रेणीप्रमाणं पगार मिळणार आहे. 178 पदांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 11,अनूसुचित जमाती 3, विमुक्त जाती 3, भटक्या जमाती 4, भज 2, इतर मागास प्रवर्ग 32, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 18, ईडब्ल्यूएस 18 आणि खुल्या प्रवर्गासाठी 87 जागा असतील.
निरीक्षक पदासाठी कोण अर्ज करणार?
निरीक्षक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दहावी किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषय (निम्नस्तर किंवा उच्चस्तर) घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. संगणकाचं ज्ञान असल्याबाबतचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. याशिवाय निरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यवसायिक प्रमाणपत्र असावे.
मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या निरीक्षक पदाच्या भरतीनुसार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यास एक महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करु शकतात.
निरीक्षक पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केल्यानंतर शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीनं करणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी अर्जाचं शुल्क 1000 रुपये असेल तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. पुढील काळात निरीक्षक पदाच्या संख्येत वाढ देखील होऊ शकते, असं मुंबई महापालिकेच्या जाहिरातीमध्य म्हटल आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे. दरम्यान, अर्ज सादर करताना महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे.
इतर बातम्या :
Income Tax Recruitment 2024: आयकर विभागात नोकरी मिळवण्याची नामी संधी; 56 हजारांहून अधिक मिळेल पगार