मुंबई : मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. एकणू 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. मुंबई महापालिकेनं भरती प्रक्रियेत निश्चित केलेल्या काही अटींवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.  मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनाने या भरतीसाठी घातलेल्या जाचक अटी अद्याप शिथिल केलेल्या नाहीत, असं उमेदवारांचं मत आहे. 


इयत्ता दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याची अट काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने उमेदवारांकडून दहावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मागितले आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्जच स्वीकारला जात नसल्याने अनेकजण वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. 


भरतीसाठी अर्ज कुठं करता येणार? 


मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'कार्यकारी सहायक' (लिपिक) पदाच्या 1,846 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास  20 ऑगस्टला सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबर 2024 आहे.  


 या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराने दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. याशिवाय अर्ज भरताना पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे.


दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा यूपीएससी परीक्षेत अशा प्रकारची अट नसते. मात्र, मुंबई महापालिकेनं त्यांच्या भरती प्रक्रियेत दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणं ही अट निश्चित केली आहे. त्यामुळं अनेक उमेदवार अर्ज करण्यास वंचित राहणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांकडून मागणी करुन देखील मुंबई महापालिका प्रशासनानं त्यांच्या नियमामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळं आगामी काळात मुंबई महापालिका प्रशासन कार्यकारी सहायक म्हणजेच लिपीक पदाच्या परीक्षेच्या नियमात बदल करणार का हे पाहावं लागेल. 
 
दरम्यान, विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई महापालिका कार्यकारी सहायक (लिपिक) भरतीमधील जाचक अट काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, मुंबई महापालिका याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. 
 
मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपीक) पदाच्या 1 हजार 846 रिक्त जागा सरळसेवा प्रक्रियेनं भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती-अ (49), भटक्या जमाती-ब (54), भटक्या जमाती-क (39), भटक्या जमाती-ड (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (185), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (185), खुला प्रवर्ग (506) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या :


BMC Recruitment 2024 : गुड न्यूज, मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज कधी करायचा? जाणून घ्या सविस्तर


Success Story:नोकरीसाठी भटकंती थांबवली, नांदेडच्या शेतकऱ्यानं 3 एकरातील पपईतून काढले 15 लाख!