मुंबई : मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक म्हणजेच लिपीक (BMC Recruitment 2024) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली होती. मुंबई महापालिकेनं 1846 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. या भरती प्रक्रियेतील पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण होण्यासंदर्भातील अट शिथिल करावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली होती. राजकीय नेत्यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला होता. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना मुंबई महापालिकेनं भरती प्रक्रिया स्थगित करत शैक्षणिक पात्रतेतील बदलाबाबतची अट बदलण्याचा निर्णय मान्य केल्याचं जाहीर केलं. आता मुंबई महापालिका नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळं शैक्षणिक पात्रतेच्या अटीमुळं ज्यांना अर्ज भरता आले नव्हते त्यांना अ्ज सादर करण्यासाठी नव्यानं जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. याशिवाय आतापर्यंत म्हणजेच 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत ज्यांनी अर्ज सादर केले होते, त्यांनी काय करायचं याबाबतची माहिती देखील मुंबई महापालिका प्रशासनानं दिली आहे.
मुंबई महापालिका शैक्षणिक अट दुरुस्त करणार
मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक भरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीत पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण असणं बंधनकार केलं होतं. याशिवाय कला, वाणिज्य आणि विज्ञान यासह इतर शाखांमध्ये पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला 45 टक्के गुण मिळवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी या अटीला विरोध करत ही अट शिथिल करण्याची मागणी केली होती. अखेर स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरतीची तयारी करणारे विद्यार्थी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मागणी सूचनांचा विचार करुन मुंबई महापालिकेनं अट शिथिल करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळं जे विद्यार्थी दहावी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले नाहीत किंवा पदवीला ज्यांना 45 टक्के गुण मिळाले नाहीत ते या पदांसाठी अर्ज सादर करु शकतात.
यापर्वी अर्ज केलेल्यांनी काय करायचं?
मुंबई महापालिकेनं 1846 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ही 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. अखेर काल मुंबई महापालिकेनं विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत अटी बदलणार असल्याची घोषणा केली. या भरतीची नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याचं देखील मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं. याशिवाय ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज सादर केले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज दाखल करण्याची आवश्यकता देखील नाही, असंही मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
इतर बातम्या :
मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात