मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना युवराजने हैदराबादकडून 23 चेंडूत 39 धावांची खेळी केली. तसंच हैदराबादने हा सामना 85 धावांनी जिंकला.
या सामन्यानंतर युवराज थेट मुंबई इंडियन्सच्या मैदानाबाहेरील ताफ्याकडे वळला. ते मुंबईचा मेंटर आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिनजवळ गेला आणि थेट त्याचे पाय पकडले. यावेळी सचिनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत युवराजने सचिनचे पाय पकडले होते.
सचिनप्रती युवराजला नेहमीच आदराची भावना आहे. त्यामुळेच युवराज सचिनला गुरुस्थानी मानतो.
यापूर्वीही सचिनच्या पायावर माथा
युवराजने काल पहिल्यांदाच सचिनचे पाय धरले असं नाही. यापूर्वी गेल्यावेळी दिल्लीकडून खेळणाऱ्या युवराज सचिनच्या पाया पडला होता.
तसंच टीम इंडियाने 2011 साली विश्वचषक जिंकला, तेव्हाही युवराजने सचिनप्रती आदरभाव व्यक्त केला होता.
याशिवाय जुलै 2014 मध्ये लॉर्ड बिसेटेनरी सेलिब्रेशन दरम्यान युवारज आणि सचिन आमनेसामने आले होते. सचिन मेर्लेबोन क्रिकेट क्लबचा कर्णधार होता, तर युवराज 'रेस्ट ऑफ द वर्ल्ड'कडून खेळत होता. त्यावेळी युवराजने 134 चेंडूत 132 धावांची शानदार खेळी केली मात्र सचिनच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला. मग क्रिज सोडण्यापूर्वी युवराज सचिनच्या पाया पडला होता.
फोटोवर सचिनचा मुलगा अर्जुनची कमेंट
युवराज आणि सचिनचा कालचा फोटो सोशल मीडियावर लाखो लाईक्स मिळवत आहे. या फोटोवर सचिनचा मुलगा अर्जुननेही कमेंट केली आहे. युवराजने सचिनबद्दल दाखवलेल्या आदराच्या भावनेबद्दल अर्जुनने धन्यवाद मानले आहेत.
युवराजच्या मोबाईलमध्ये 'गॉड'
जगभरात क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर युवराज सिंहसाठी देवापेक्षा अधिक भावनेचा आहे. त्यामुळेच युवराजने आपल्या मोबाईलमध्ये सचिनचा नंबर गॉड या नावाने सेव्ह केला आहे.
हैदराबादचा विजय
दरम्यान कालच्या सामन्यात युवराजने 23 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नर 48 आणि शिखर धवनच्या 82 धावांच्या जोरावर हैदराबादने 3 बाद 177 धावा केल्या होत्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 16.3 षटकात 92 धावांतच गारद झाला.