पुणे : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा आठ विकेट्सने पराभव केला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची खेळी या सामन्यात महत्त्वपूर्ण ठरली. परंतु, या सामन्यादरम्यान मुंबईच्याच संघातील हरभजन सिंह आणि अंबाती रायुडू यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

 

पुणे संघाची फलंदाजी चालू असताना अकराव्या ओव्हरमध्ये हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर पुण्याच्या सौरभ तिवारीने लॉग ऑनला शॉट लगावला. मात्र तिथे असलेल्या रायुडूने डाईव्ह मारुन बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अपयश आल्याने हरभजन त्याच्यावर चांगलाच भडकला. त्याने हातवारे करुन संताप व्यक्त केला. यानंतर एरव्ही शांत असलेल्या अंबाती रायुडूनेही हरभजनला रागाने प्रत्युत्तर दिले.

 

या प्रकारानंतर दोघांमधील वाद वाढतो की काय, अशी शक्यता होती. परंतु हरभजनने स्वतःच पुढाकार घेऊन रायुडूची मोठेपणाने समजूत काढली. यामुळे दोघांमधील वाद तिथेच मिटला. यानंतर हरभजनने पीटर हॅण्डकोम्बची विकेट घेतल्यावर दोघांनी  एकमेकांना मिठी सेलिब्रेशन केलं.

 

हरभजनच्या रागाचा पारा चढलेला असताना त्याने एवढ्या समजूतदारपणाने माघार घेतली, त्यामुळे सर्व प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते.

 

दरम्यान, हरभजनचे मैदानावरील वाद काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू सायमंड्ससोबतचा हरभजनचा वाद चर्चेचा विषय होता. एवढंच नव्हे तर हरभजनने आयपीएलच्या एका मोसमात पंजाब संघाकडून खेळणाऱ्या एस. श्रीशांतच्या श्रीमुखातही लगावली होती.

 

परंतु कालच्या सामन्यात हरभजनने आपल्या ज्युनिअर खेळाडूसोबत झालेल्या वादानंतर संयम राखल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

 

पाहा व्हिडीओ