बंगळुरु : रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली मैदानात अगदी जीव ओतून खेळतो. कोहलीची संघाविषयी बांधिलकी किती मोठी आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.


 

विराटच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झालेली असूनही तो किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात खेळणार आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत आरसीबीसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे दुखपतग्रस्त हाताला अनेक टाके पडूनही त्याने विश्रांती न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कोलकाताविरुद्ध लढतीत झेल पकडण्याच्या प्रयत्नात विराटच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. उपचारासाठी विराटला मैदानाबाहेर जावं लागलं. पण जखमेवर पट्टी लावून विराट पुन्हा मैदानात उतरला. इतकंच नाही तर त्याने 51 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 75 धावांची खेळी करुन बंगलोरला विजय मिळवून दिला.

 

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराटनेच सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने 12 सामन्यांत 752 धावांचा रतीब घातला असून तीन शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.