बंगळुरु : एबी डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने गुजरात लायन्सचा चार विकेट्सनी धुव्वा उडवला आणि आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या फायनलमध्ये धडक मारली.

 

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने बंगलोरला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं. पण धवल कुलकर्णीच्या भेदक माऱ्यासमोर बंगलोरची पाच बाद 29 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण डिव्हिलियर्सने आधी स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 39 धावांची आणि मग इक्बाल अब्दुल्लाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 91 धावांची अभेद्य भागीदारी रचून बंगलोरला फायनलचं तिकीट मिळवून दिलं.

 

डिव्हिलियर्सने 47 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 79 धावांची खेळी उभारली. तर इक्बाल अब्दुल्लाने नाबाद 33 आणि स्टुअर्ट बिन्नीने 21 धावांची खेळी केली. बंगलोरकडून धवल कुलकर्णीने चार षटकांत 14 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या.

 

त्याआधी शेन वॉटसन, इक्बाल अब्दुल्ला आणि ख्रिस जॉर्डनच्या प्रभावी माऱ्यासमोर गुजरात लायन्सला 20 षटकांत सर्व बाद 158 धावांचीच मजल मारता आली. वॉटसनने चार, तर इक्बाल अब्दुल्ला आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. गुजरातकडून ड्वेन स्मिथने एकाकी झुंज देत 73 धावांची खेळी केली.