हैदराबाद : महेंद्रसिंह धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला अखेर विजयाचं सुख लाभलं. पुण्याने सनरायझर्स हैदराबादला हरवून आयपीएलमध्ये आपला दुसरा विजय साजरा केला. पुण्याचा हा सहा सामन्यांमधला दुसरा विजय आहे तर हैदराबादचा हा सहा सामन्यांमधला तिसरा पराभव ठरला.

 

हैदराबादच्या मैदानात झालेला हा सामना पावसामुळे तासभर उशिराने सुरु झाला. पुण्याच्या गोलंदाजांनी हैदराबादला 20 षटकांत आठ बाद 118 धावांवर रोखून आपल्या टीमच्या विजयाचा पाया घातला. अशोक डिंडाने 4 षटकांत एक निर्धाव आणि 23 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स काढल्या. मिचेल मार्शने दोन तर थिसारा परेराने एक विकेट काढली आणि आर अश्विनने 4 षटकांत अवघ्या 14 धावांत दोन विकेट्स काढल्या.

 

शिखर धवनच्या 56 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता हैदराबादचे बाकीचे फलंदाज साफ अपयशी ठरले. मग विजयासाठीचं 119 धावांचा पाठलाग करताना पुण्याने 11 षटकांत तीन बाद 94 धावांची मजल मारली होती. तेव्हा पुन्हा पावसानं व्यत्यय आणल्याने अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार पुण्याला विजेता घोषित करण्यात आलं.

 

स्टीव्हन स्मिथने नाबाद 46 धावांची आणि फॅफ ड्यू प्लेसिने 30 धावांची खेळी रचून पुण्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.