मुंबई : ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाबनं बलाढ्य कोलकात्यावर 14 धावांनी मात करून, आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीत नवा रंग भरला आहे. कोलकात्याचा तेरा सामन्यांमधला हा पाचवा पराभव ठरला आहे. त्यामुळं अव्वल स्थानावरच्या मुंबईला गाठण्याचा कोलकात्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
त्याच वेळी पंजाबनं बारा सामन्यांमध्ये सहावा विजय मिळवून आपली गुणकमाई बारावर नेली. आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब सध्या पाचव्या स्थानावर असलं तरी त्यांना चौथ्या स्थानावरच्या हैदराबादला ओव्हरटेक करण्याची संधी आहे.
दरम्यान, मोहालीतल्या सामन्यात ख्रिस लिनचा अपवाद वगळता कोलकात्याच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. पंजाबनं दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा कोलकात्याचा प्रयत्न 14 धावांनी अयशस्वी ठरला आहे.
पंजाबचा लेग स्पिनर राहुल तेवातियानं 18 धावांत दोन, तर मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मानं 24 धावांत दोन विकेट्स काढून कोलकात्याला 20 षटकांत सहा बाद 153 धावांत रोखलं. त्यापैकी 84 धावा या एकट्या ख्रिस लिनच्या आहेत.
त्याआधी, रिद्धिमान साहा आणि ग्लेन मॅक्सवेलनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 71 धावांच्या भागिदारीच्या जोरावर पंजाबनं 20 षटकांत सहा बाद 167 धावांची मजल मारली होती. साहानं 33 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलनं 25 चेंडूंतच एक चौकार आणि चार षटकारांसह 44 धावांची खेळी उभारली.