मुंबई : मुंबई इंडियन्सनं ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात यजमान कोलकात्याचा नऊ धावांनी पराभव करून आयपीएलच्या साखळीत 'नंबर वन'चा निर्विवाद मान मिळवला. मुंबईकडून झालेल्या पराभवामुळं कोलकात्याची मात्र साफ निराशा झाली.

पुणे आणि पंजाब संघांमधल्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याचा क्रमांक तिसरा की, चौथा हे स्पष्ट होईल. दरम्यान, ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात मुंबईनं कोलकात्याला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकात्याला 20 षटकांत आठ बाद 168 धावांत रोखलं.

मुंबईकडून टीम साऊदी, विनयकुमार आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल जॉन्सन आणि कर्ण शर्मानं एकेक विकेट काढून त्यांना छान साथ दिली. त्याआधी, या सामन्यात सौरभ तिवारी आणि अंबाती रायुडूच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं 20 षटकांत पाच बाद 173 धावांची मजल मारली होती.

सौरभ तिवारीनं 43 चेंडूंमध्ये नऊ चौकारांसह 52 धावांची, तर अंबाती रायुडूनं 37 चेंडूंमध्येच 6 चौकार आणि 3 षटकारांसह 63 धावांची खेळी उभारली. रोहित शर्मानं 21 चेंडूंत 27 धावांची खेळी केली.