मोहाली : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरने किंग्स इलेव्हन पंजाबवर अवघ्या एका धावेने सनसनाटी विजय मिळवून आयपीएलमधले आपलं आव्हान कायम राखलं. बंगलोरचा नऊ सामन्यांमधला हा चौथा विजय ठरला. या चार विजयांसह बंगलोरच्या खात्यात आठ गुण झाले असून, आयपीएलच्या गुणतालिकेत बंगलोर आता सहाव्या स्थानावर आहे.


 

 

दरम्यान, बंगलोर आणि पंजाब संघांमध्ये मोहालीत झालेला सामना अखेरच्या चेंडूंपर्यंत रंगला. या सामन्यात बंगलोरने पंजाबला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने विजयासाठी कठोर संघर्ष करुनही त्यांना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.

 

 

मुरली विजयच्या कर्णधारास साजेशा खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत चार बाद 174 धावांची मजल मारली. मुरली विजयची ही खेळी पंजाबला विजय मिळवून देऊ शकली नाही. मुरली विजयने 57 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह 89 धावांची खेळी उभारली.

 

 

त्याआधी एबी डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर बंगलोरनं 20 षटकांत सहा बाद 175 धावांची मजल मारली. डिव्हिलियर्सने 35 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 64 धावांची खेळी रचली. लोकेश राहुलने 42 आणि सचिन बेबीने 33 धावांची खेळी करुन बंगलोरच्या डावाच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला.