मुंबई: इंग्लंडचा स्फोटक फलंदाज केविन पीटरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे वेध लागले आहेत. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याच्या पर्यायही खुला असल्याचं त्यानं मान्य केलं.

 

पीटरसन सध्या आयपीएलमध्ये धोनीच्या रायझिंग पुणे संघाकडून खेळत आहे. पहिल्याच सामन्यात पुणे संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात केविन पीटरसनने नाबाद 21 धावा केल्या.

 

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पीटरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत विचारण्यात आलं, त्यावर तो म्हणाला, " मी आंतरराष्ट्रीय पुनरागमनाच्या विचारात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याची कमतरता भासते".

 

पीटरसन मूळचा दक्षिण आफ्रिकेचाच, पण तिथून संधी न मिळाल्यानं त्यानं इंग्लंडची वाट धरली. पीटरसनची आई इंग्लंडची असल्यानं त्याला इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. 2004 ते 2014 या कालावधीत पीटरसननं इंग्लंडकडून 104 कसोटीत 8,181  आणि 136 वन डेत 4,440 तर 37 टी20 सामन्यांत 1,176 धावा केल्या. पण 2014 साली अॅशेस मालिकेनंतर त्याची संघातून हकालपट्टी झाली.

 

आता दुसऱ्या देशाकडून खेळायचं तर आयसीसीच्या नियमांनुसार पीटरसनला चार वर्ष वाट पाहावी लागेल. म्हणजे 2018 मध्ये तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळू शकेल. पण त्यावेळी त्याचं वय 37 वर्ष असेल, त्यामुळं पीटरसनला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळेल का हा प्रश्नच आहे.