मुंबई: विराट कोहली सध्या त्याच्या कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांपाठोपाठ आयपीएलच्या रणांगणातही विराट कोहलीनं धावांची जणू टांकसाळ उघडली आहे. तो शतकामागून शतकं ठोकतोय. आणि विशेष म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये खेळतानाही त्याला आपल्या तंत्रशुद्ध फटक्यांना कुठं मुरड घालावी लागलेली नाही.   बंगलोरचा हा कर्णधार पंजाबविरुद्धच्या सामन्यात पुन्हा बरसला. त्यानं यंदाच्या मोसमात चौथं शतक साजरं केलं.   बंगळुरूच्या मैदानात बुधवारी आधी बरसला तो पाऊस आणि मग कोसळला तो विराट कोहली. एखाद्या धबधब्यासारखा...   विराटचा गोल्डन फॉर्म   वास्तविक विराट कोहली आयपीएलच्या रणांगणात यंदा दाखल झाला तो ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला त्याचा गोल्डन फॉर्म घेऊनच. त्यामुळं गाव बदललं काय, खेळपट्टी बदलली काय किंवा समोरचं आक्रमण बदललं काय... विराटचा धावांचा ओघ हा अखंड ओसंडून वाहातोय... धबाबा लोटती धारा.. धबाबा तोय आदळे या समर्थांनी वर्णन केलेल्या शिवथरघळीतल्या धबधब्यासारखा.   बंगळुरूतही पुन्हा तेच घडलं. विराटनं पंजाबच्या आक्रमणाची अक्षरश: पिसं काढली आणि केवळ 47 चेंडूंमध्येच आपलं शतक साजरं केलं. यंदाच्या आयपीएलमधलं त्याचं हे चौथं शतक ठरलं. आयपीएलच्या इतिहासात एकाच मोसमात चार शतकं ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.   पंजाबविरुद्धच्या सामन्यात विराटनं 50 चेंडूंत 113 धावांची खेळी उभारली. त्याच्या या शतकाला बारा चौकार आणि आठ षटकारांचा साज होता.   विराट कोहलीचं हे शतक दोन कारणांनी खास होतं. पहिलं कारण म्हणजे कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. अंगठा आणि तर्जनी यांना जोडणारी त्वचा चेंडूच्या आघातानं फाटली होती. पण त्या दुखापतीचा अजिबात बाऊ न करता विराट मैदानात उतरला. आणि गोलंदाजांना अनुकूल अशा पावसाळी वातावरणाचाही सामना करून त्यानं आपलं शतक झळकावलं.   आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराटच्या शतकांचा सिलसिला हा त्याचं आराध्यदैवत असलेल्या सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी म्हणजे 24 एप्रिलला सुरू झाला. गुजरात लायन्ससमोर त्यानं 63 चेंडूंत नाबाद 100 धावांची खेळी उभारली. मग रायझिंग पुणेविरुद्धच्या सामन्यात विराटनं 59 चेंडूंत नाबाद 108 धावांची खेळी रचली. त्यानंतर पुन्हा गुजरात लायन्ससमोर त्यानं 55 चेंडूंत 109 धावांची खेळी केली.   पंजाबविरुद्धच्या शतकानं विराटच्या खात्यावर आता 13 सामन्यांमध्ये चार शतकं आणि पाच अर्धशतकांसह तब्बल 865 धावांचा बॅलन्स जमा झाला आहे.   आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा   आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 4002 धावा करण्याचा पराक्रमही याच खेळीनं त्याच्या नावावर करून टाकला आहे. आयपीएलच्या 136 सामन्यांत चार हजार धावांची वेस ओलांडताना विराटनं चार शतकं आणि 24 अर्धशतकं ठोकली आहेत.   विराट कोहलीचा ताजा फॉर्म लक्षात घेतला, तर आयपीएलच्या एकाच मोसमात एक हजारपेक्षा अधिक धावांचा विक्रमही यंदा त्याच्यासाठी अशक्य दिसत नाही. पण एकाच मोसमात चार शतकं किंवा एकाच मोसमात एक हजारपेक्षा अधिक धावांच्या त्या विक्रमांपेक्षा विराट कोहलीला यंदा आयपीएलचं विजेतेपद जास्त खुणावत असावं.   आयपीएलच्या पहिल्या आठ मोसमात बंगलोरला एकदाही विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. पण बंगलोरच्या शोकेसमधली आयपीएलची ट्रॉफीची ती उणीव यंदा दूर करण्याचं रॉयल चॅलेंज स्वीकारूनच विराट प्रत्येक सामन्यात खेळताना दिसतोय.