मुंबई: आयपीएलच्या नव्या मोसमाला सुरुवात होण्यास अवघे काही तास उरले आहेत. 9 एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजाएन्ट्स या सामन्याने आयपीएलचं बिगूल वाजेल. यंदाही आयपीएलमध्ये नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सध्या त्यांचं नाव चर्चेत नसलं, तरी येत्या काळात ते प्रकाशझोतात येऊ शकतात. अशाच काही खेळांडूंवर एक नजर   शिवील कौशिक -
20 वर्षीय शिवील कौशिक उजव्या हाताने गोलंदाजी करतो. त्याची गोलंदाजीची शैली हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शिवील कौशिक हा दक्षिण आफ्रिकेच्या पॉल अडम्सप्रमाणे गोलंदाजी करतो. कर्नाटकच्या या खेळाडूला सुरेश रैनाच्या गुजरात लायन्स संघाने खरेदी केलं आहे. गुजरातने त्याला 10 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं आहे.   आयपीएलमध्ये मोठ्या खेळाडूंसोबत खेळणं हे माझं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे, असं शिवील म्हणतो. 6 फूट उंच शिवील त्याच्या उत्कृष्ट लाईन-लेन्थसाठी परिचीत आहे.   अक्षय कर्णेवार-
विदर्भाकडून खेळणारा 23 वर्षीय फिरकीपटू अक्षय कर्णेवार यंदा चांगलाच चर्चेत आला. अक्षय दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो. अक्षय यवतमाळच्या पांढरकवडा इथला रहिवाशी आहे. आयपीएलमध्ये त्याला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने खरेदी केलं आहे.     मुरुगन अश्विन-
आयपीएलच्या 9 व्या मोसमात मुरुगन अश्विनसाठी तब्बल 4 कोटी 50 लाख रुपयांची बोली लागली. एम अश्विनची बेस प्राईस केवळ 10 लाख रुपये होती. त्यामुळे बेस प्राईसच्या 45 पट जास्त रक्कम मिळवणारा अश्विन किती महत्त्वाचा असू शकतो, हे येत्या काळात समजेल.   मुरुगन अश्विन हा धोनीच्या पुणे सुपरजाएंट्सकडून खेळणार आहे. अश्विन लेगस्पिनर आहे. मुरुगन अश्विनने 6 टी 20 सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या कामगिरीकडे धोनीचं विशेष लक्ष असेल.   नाथू सिंह-
राजस्थानचा मध्यमगती गोलंदाज नाथू सिंह हा एका रात्रीत करोडपती झाला.  नाथूसाठी  आयपीएल 9 साठी तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची बोली लागली. एका मजुराचा मुलगा असलेल्या नाथूसाठी आयपीएल एक सुवर्णसंधी ठरू शकते.   नाथू सिंहचा वेगाचा मारा रणजी ट्रॉफीत पाहायला मिळाला. नाथूने पहिल्याच रणजी सामन्यात तब्बल 7 विकेट्स घेतल्या होत्या. यंदा नाथू मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.