निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
कोलकात्याकडून दिल्लीचा नऊ विकेट्सनी धुव्वा
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2016 05:47 PM (IST)

कोलकाता : गौतम गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या नवव्या मोसमात विजयी सलामी दिली. ईडन गार्डन्सवरच्या सामन्यात कोलकात्यानं दिल्लीचा अवघ्या 98 धावांत खुर्दा उडवला होता. कोलकात्यानं विजयासाठीचं 99 धावांचं आव्हान 35 चेंडू आणि नऊ विकेट्स राखून पार केलं. रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीरच्या 69 धावांच्या सलामीनं या सामन्यात कोलकात्याचा विजय आणखी सोपा केला. उथप्पानं 33 चेंडूंत सात चौकारांसह 35 धावांची आणि गंभीरनं 41 चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद 38 धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याच्या आंद्रे रसेल आणि ब्रॅड हॉगनं प्रत्येकी तीन विकेट्स काढून दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं. जॉन हॅस्टिंग्स आणि पियूष चावलानं प्रत्येकी दोन विकेट्स काढून त्यांना छान साथ दिली. या सामन्यात दिल्लीचा कार्लोस ब्रॅथवेट सपशेल अपयशी ठरला. त्याला चार चेंडूंत केवळ सहाच धावा करता आल्या.