मुंबई: आधी टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका, मग ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषक आणि त्यानंतर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक.. यामुळं भारतीय क्रिकेटरसिकांना ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा मिळालेला डोस इतका जबरदस्त होता की, त्यांनी आयपीएल सामन्यांकडे पाठच फिरवलीय. त्यात परदेशातल्या स्टार खेळाडूंवर दुखापतींच्या कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याची वेळ आल्यानं या स्पर्धेचा रंग अगदीच फिका पडलेला दिसतोय. आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग की, इन्जुअर्ड प्लेयर्स लीग असा प्रश्न सध्या देशभरातल्या क्रिकेटरसिकांना पडलाय. कारण आयपीएलचा यंदाचा जेमतेम अर्धा मोसम संपलाय, पण अनेक दिग्गजांना दुखापतींच्या कारणास्तव आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. यंदाच्या मोसमात दुखापतींचा सर्वात मोठा फटका बसलाय महेंद्रसिंग धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सला.. *केविन पीटरसन, रायझिंग पुणे सुपरजायंट्स पुण्याच्या केविन पीटरसनला मोसमातल्या आपल्या चौथ्याच सामन्यात म्हणजे बंगलोरविरुद्धच्या लढतीतून रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळं पीटरसननं माघार घेतली. *फॅफ ड्यू प्लेसी, रायझिंग पुणे सुपरजायंट्स पुण्याचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसीच्या बोटाचं हाड मोडलं. ड्यू प्लेसीला डॉक्टरांनी सहा आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्यानं, त्याला आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे. *मिचेल मार्श, रायझिंग पुणे सुपरजायंट्स पुण्याचा अष्टपैलू मिचेल मार्शनं बरगड्यांच्या दुखापतीमुळं आयपीएलमधून माघार घेतली. *स्टीव्हन स्मिथ, रायझिंग पुणे सुपरजायंट्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं यंदा पुण्यासाठी दमदार कामगिरी बजावली होती. पण मनगटाच्या दुखापतीमुळं तो उर्वरीत सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. *लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्स श्रीलंकेचा लसिथ मलिंगाला गुडघ्याच्या दुखापतीमुळं आशिया चषकात आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात खेळू शकला नव्हता. त्याला आयपीएलमधूनही माघार घ्यावी लागली आहे. *लेण्डल सिमन्स, मुंबई इंडियन्स वेस्ट इंडिजच्या विश्वचषक विजयाचा हीरो लेण्डल सिमन्सच्या पाठीच्या दुखापतीनं उचल खाल्यामुळं त्याला आयपीएलमध्ये केवळ एकाच सामन्यात खेळता आलं. *शॉन मार्श, किंग्स इलेव्हन पंजाब किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज शॉन मार्श पाठीला झालेल्या दुखापतीमुळं आयपीएलच्या उर्वरीत मोसमात खेळू शकणार नाही. *सॅम्युअल बद्री, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर कॅरिबियन लेग स्पिनर सॅम्युएल बद्रीला दुखापतीमुळं आयपीएलमधून एकही सामना न खेळता माघार घेतली. *मिचेल स्टार्क, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला पायाच्या दुखापतीमुळं ट्वेण्टी ट्वेण्टी विश्वचषकातून आणि त्यापाठोपाठ आयपीएलमधूनही माघार घ्यावी लागली. *जॉन हॅस्टिंग्स, कोलकाता नाईट रायडर्स ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन हॅस्टिंग्जचा घोटा दुखावल्यामुळं त्याला मायदेशी परतावं लागलं. हॅस्टिंग्सला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागणार असून, त्यानंतर सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय.