पुणे : आयपीएलच्या मैदानात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महेंद्रसिंग धोनीच्या रायझिंग पुणेला लोळवलं.  रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं रायझिंग पुणेवर 13 धावांनी मात करून यंदाच्या मोसमातला आपला दुसरा विजय साजरा केला. तर पुण्याचा हा चार सामन्यांमधला तिसरा पराभव ठरला.   मात्र याच सामन्यात स्लो ओवर रेटमुळे विराट कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आयपीएल आयोजकांनी याबाबत पत्रक जारी करुन विराटला दंड ठोठावण्यात आल्याचं जाहीर केलं.   आयपीएलच्या सध्याच्या हंगामात कोहली स्लो ओवर रेट प्रकरणात पहिल्यांदाच दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचं पत्रकात म्हटलं आहे.   डिव्हिलियर्स, कोहलीची दमदार खेळी    गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पुण्यासमोर विजयासाठी 186 धावांचं भलं मोठं आव्हान होतं. त्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेनं 60 धावांची तर धोनीनं 41 धावांची खेळी केली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर थिसारा परेरा आणि रजत भाटियाच्या फटकेबाजीनं पुण्याच्या विजयाच्या आशा जागवल्या. पण शेन वॉटसननं एकोणिसाव्या षटकात परेरा आणि अश्विनला बाद केलं.   वॉटसननं दोन तर केन रिचर्डसननं तीन विकेट्स काढल्या आणि बंगलोरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.   त्याआधी विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर बंगलोरनं 20 षटकांत तीन बाद 185 धावांची मजल मारली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी रचून बंगलोरच्या विजयाचा पाया घातला. कोहलीनं 63 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी केली तर डिव्हिलियर्सनं 46 चेंडूंमध्ये 83 धावा फटकावल्या.