हैदराबाद : आयपीएलच्या रणांगणात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आज तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून आपलं गुणांचं खातं उघडलं.


 

हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार डेव्हिड वॉर्नर. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादला विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं होतं. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 90 धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादने 15 चेंडू आणि सात विकेट्स राखून विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.

 

मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा शिखर धवन पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. पण डेव्हिड वॉर्नरने मोझेस हेन्ऱिक्सच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली आणि हैदराबादचा डाव सावरला. मग वॉर्नरने इयान मॉर्गनच्या साथीने 34 धावांची आणि दीपक हुडाच्या साथीने 45 धावांची अभेद्य भागीदारी रचून हैदराबादला विजय मिळवून दिला.

 

डेव्हिड वॉर्नरने 59 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 90 धावांची खेळी उभारली. मुंबई इंडियन्सकडून टिम साऊदीने तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

 

त्याआधी हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला 20 षटकांत सहा बाद 142 धावांवर रोखलं होतं. मुंबई इंडियन्ससाठी अंबाती रायुडूने 54 आणि कृणाल पंड्याने नाबाद 49 धावांची खेळी केली. हैदराबादकडून बरिंदन सरनने सर्वाधिक तीन विकेट्स काढल्या.