मुंबई : रॉयल चॅलेंजर बंगलोर्सचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल बाबा बनला आहे. गेलची पार्टनर नताशा बॅरिज नुकतीच बाळंत झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. तिला आणि नवजात बालकाला पाहण्यासाठी ख्रिस गेल जमैकाला रवाना झाला आहे. त्यामुळे  विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पुढच्या काही सामन्यांमध्ये ख्रिस गेलशिवायच खेळावं लागणार आहे.

ख्रिस गेल मायदेशी रवाना


 


गेलने मायदेशी परतताना 'आय एम ऑन माय वे, बेबी' असं ट्वीट करुन, आपण माघारी परतत असल्याची कल्पना फॅन्सना दिली होती. त्यामुळे बंगलोरला 20 एप्रिलला मुंबईविरुद्धचा आणि 22 एप्रिलला पुण्याविरुद्धचा सामन्यात ख्रिस गेल नसेल.

 


ख्रिस गेलला सलामीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावता आली नव्हती. या दोन्ही सामन्यांमध्ये मिळून त्यानं केवळ एकच धाव केली होती. पण तरीही बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने गेलच्या फॉर्मबद्दल चिंता करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

 

आता बंगळुरुचा संघ 20 आणि 22 एप्रिलच्या सामन्यात गेलशिवाय मैदानात उतरेल. गेल 25 एप्रिलला भारतात परतून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात सहभागी होईल असं सांगण्यात येत आहे.