मुंबई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा दोन षटकं आणि सहा विकेट्स राखून धुव्वा उडवला आणि आपलं होमग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमचा विजयाने निरोप घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, वानखेडे स्टेडियमवरचा यंदाच्या मोसमातला हा अखेरचा सामना होता.


 

रोहित शर्मा आणि कायरन पोलार्ड हे मुंबई इंडियन्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पोलार्डने तुफानी फलंदाजी करत अवघ्या 17 चेंडूत सहा षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद 51 धावा ठोकल्या. तर रोहितने 49 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 68 धावांची खेळी उभारली.

 

या सामन्यात कोलकात्याने मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्माने कर्णधारास साजेशी खेळी करुन या सामन्यात मुंबईच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्याने एक खिंड लावून दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी भागीदारी रचल्या.

 

रोहितने अंबाती रायुडूच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. मग रोहित आणि जोस बटलर यांनी चौथ्या विकेटसाठी 28 धावांची भर घातली. त्यानंतर रोहित आणि कायरन पोलार्डने पाचव्या विकेटसाठी पाच षटकांत 72 धावांची अभेद्य भागीदारी रचून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.