मोहाली: आयपीएलच्या रणांगणात आज सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सची डेव्हिड मिलरच्या किंग्स इलेव्हन पंजाबशी टक्कर होणार आहे. गुजरात लायन्सचा हा आयपीएलमधला पहिलाच सामना आहे. मोहालीत आज रात्री आठ वाजता हा सामना खेळवला जाईल.


 

गेली आठ वर्ष चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्त्व करणारा रैना यंदा गुजरात लायन्स या नव्या संघाचं नेतृत्त्व करतोय आणि ही जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

गुजरातचा संघ हा आयपीएलमध्ये नवखा असला तरी त्यांच्याकडे सुरेश रैनासह रवींद्र जाडेजचाही समावेश आहे. त्याशिवाय गुजरातकडे ब्रेण्डन मॅक्युलम, जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, डेल स्टेनसारखे तगडे विदेशी शिलेदारही गुजरातच्या संघात आहेत.

 

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकादरम्यान अवघ्या जगाला चॅम्पियन गाण्यावर ठेका धरायला लावणाऱ्या ड्वेन ब्राव्होच्या कामगिरीवर तर सर्वांची नजर राहील. विंडीजला दुसऱ्यांदा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणारा ड्वेन ब्राव्हो आता गुजरात लायन्सला चॅम्पियन बनवण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाबनं यंदा जॉर्ज बेलीऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या हाती नेतृत्त्वाची धुरा सोपवली.

 

डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, मिचेल जॉन्सन आणि मुरली विजयच्या खांद्यावर पंजाबच्या संघाची जबाबदारी असेल.

 

आता मोहालीत पंजाबच किंग ठरणार की गुजरात चॅम्पियन डान्स करणार, यावरच सर्वांची नजर राहील.