राजकोट : गुजरात लायन्सने विजयाचा धडाका सुरुच ठेवला आहे. सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सने धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. यंदाच्या आयपीएल मोसमातील गुजरातचा हा सलग दुसरा विजय आहे.


 

राजकोटमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात  पहिल्यांदा फलंदाजी करताना रायझिंग पुणे सुपरजायंटने निर्धारित 20 षटकात 163 धावा केल्या होता. यानंतर गुजरात लायन्सने तीन विकेट्सच्या मोबदल्यात 18 षटकातच 164 धावांचं आव्हान पार केलं.

 

गुजरातच्या विजयाचे हिरो

 

या सामन्यात गुजरातच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अरॉन फिन्चने 36 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा ठोकल्या. तर ब्रेण्डन मॅक्युलमने 31 बॉलमध्ये 49 धावा केल्या. या दोघांनी मिळून 85 धावांची भागीदारी रचली.

याशिवाय गोलंदाज प्रवीण तांबेने 4 षटकात 2 विकेट्स घेतल्या तर रवींद्र जाडेजाने 4 षटकात दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

 

ड्यू प्लेसिसची 69 धावांची खेळी

 

त्याआधी पुण्याची सुरुवात अडखळत झाली. अजिंक्य रहाणे 21 धावा करुन बाद झाला. त्यानंतर केविन पीटरसन आणि ड्यू प्लेसिसने 86 धावांची भागीदारी रचली. पीटरसनने 37 धावा करुन बाद झाला. तर ड्यू प्लेसिसने 43 चेंडूत 69 धावा करता आल्या. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. यानंतर धोनी वगळता कोणालाही दोन आकडी धावसंख्या उभारता आली नाही.