बंगळुरु : क्विन्टन डी कॉकच्या खणखणीत शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोवर सात विकेटस आणि पाच चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवला. दिल्लीचा हा तीन सामन्यांमधला दुसरा विजय ठरला असून, झहीर खानच्या टीमनं चार गुणांसह गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं आहे.


 

 

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने 192 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. डी कॉकने सलामीला खेळताना अवघ्या 50 चेंडूंमध्येच शतक ठोकलं. त्याने 51 चेंडूंत 15 चौकार आणि तीन षटकारांसह 108 धावांची भक्कम खेळी केली. तर करुण नायरने 42 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 54 धावा ठोकल्या आणि डी कॉकला चांगली साथ दिली.

 

डी कॉक आणि नायरनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 134 धावांच्या भागीदारीने दिल्लीचा विजय निश्चित केला. मग अखेरच्या षटकात करूण नायरनं जेपी ड्युमिनीच्या साथीनं दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

 

त्याआधी विराट कोहलीच्या 79, एबी डिव्हिलियर्सच्या 55 आणि शेन वॉटसनच्या 33 धावांच्या खेळींच्या जोरावर बंगलोरने 20 षटकांत 5 बाद 191 धावांची मजल मारली होती.