राजकोट : मुरली विजयने कर्णधारपदाची धुरा काय सांभाळली किंग्स इलेव्हन पंजाबचं नशीबच पालटलं. पंजाबने गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात लायन्सचा 23 धावांनी धुव्वा उडवला.
राजकोटमध्ये झालेल्या या सामन्यात पंजाबच्या अक्षर पटेलने हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला. अक्षरने सातव्या षटकांत ड्वेन स्मिथला बाद केलं. त्याच अखेरच्या दोन चेंडूंवर अक्षरने दिनेश कार्तिक आणि ड्वेन ब्राव्होला माघारी धाडलं. मग अकराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जाडेजाला बाद करुन अक्षरने हॅटट्रिक साजरी केली.
आयपीएलच्या नवव्या मोसमातली ही पहिलीच हॅटट्रिक ठरली. अक्षरने चार षटकांत 21 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढून गुजरातचं कंबरडं मोडलं. त्यामुळे विजयासाठी 155 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला 20 षटकांत नऊ बाद 131 धावाच करता आल्या.
त्याआधी मुरली विजयने कर्णधारास साजेशी खेळी करुन पंजाबला 154 धावांची मजल मारुन दिली. विजयने 41 चेंडूंत सहा चौकारांसह 55 धावांची खेळी केली. तर रिद्धिमान साहाने 33 आणि डेव्हिड मिलरनं 31 धावांची खेळी करुन पंजाबच्या विजयाला हातभार लावला. पंजाबचा सात सामन्यांमधला हा दुसराच विजय असून, गुजरात लायन्सचा आठ सामन्यांमधला हा दुसरा पराभव ठरला.
अक्षर पटेलची हॅटट्रिक, पंजाबकडून गुजरातचा धुव्वा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 May 2016 03:05 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -