मुंबई : टी ट्वेण्टी वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा हार्दिक पांड्या चांगलाच प्रकाशझोतात आला. विश्वचषकानंतर आता आयपीएल गाजवण्यासाठीही हार्दिक पांड्या सज्ज झाला आहे. मात्र एकटा पांड्याच नव्हे तर त्याचा भाऊ कृणालही आता या लढाईसाठी सज्ज आहे.

 

महत्त्वाचं म्हणजे हार्दिक आणि कृणाल पांड्या दोघेही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहेत.



हार्दिक पांड्याने रायझिंग पुणे विरुद्धच्या सामन्यात केवळ 9 धावा केल्या. मात्र कृणालला अद्याप प्लेयिंग इलेवनमध्ये संधी मिळालेली नाही. त्याला आजच्या कोलकाता नाईट विरुद्धच्या सामन्यात संधी मिळू शकते.

 

कृणाल हा हार्दिकपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. दोघे सख्खे भाऊ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहेत. हे दोघे पहिलेच भाऊ आहेत जे आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळत आहेत.

 

इरफान आणि युसूफ पठाण बंधू आयपीएलमध्ये खेळतात, मात्र ते दोघेही वेगवेगळी टीममध्ये आहेत.

 

कृणालही धडाकेबाज

 

हार्दिक पांड्याप्रमाणेच कृणालही धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर तोही गोलंदाजी करतो. कृणाल डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो.



24 वर्षांच्या कृणालने नुकत्याच झालेल्या एका देशांतर्गत सामन्यांत अष्टपैलू कामगिरी केली होती. 'झवेरी प्रिमीयर लिग'मध्ये 'रिलायन्स 11' कडून खेळताना त्याने 'वायएससी 11'विरुद्ध 327 चेंडूत 336 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्याने 21 षटकार आणि 26 चौकार ठोकले होते. याशिवाय त्याने दोन विकेटही घेतल्या होत्या.

 

जर आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्याला संधी दिली, तर हार्दिक पांड्याप्रमाणे कृणालही सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.

 

हार्दिकपेक्षा 20 पट महाग

 

हार्दिक पांड्यापेक्षा कृणाल 20 पट महागडा आहे. यंदा झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने कृणालसाठी 2 कोटी रुपये मोजले, तर गेल्या वर्षी तितका प्रकाशझोतात नसलेला हार्दिकला केवळ 10 लाख रुपयांत खरेदी केलं होतं.



रणजी सामन्यात बडोद्याच्या संघात

 

हार्दिक आणि कृणाल दोघेही रणजी सामन्यात बडोद्याकडून खेळतात. सध्या इरफान पठाण बडोद्याच्या संघाचं नेतृत्त्व करतो.