कोलकाता : सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सला सलग तीन पराभवांनंतर अखेर विजयी सूर सापडला. गुजरातने कोलकाता नाईट रायडर्सला 5 विकेट्सनी हरवून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. गुजरातचा हा अकरा सामन्यांतला सातवा विजय ठरला तर कोलकात्याचा हा दहा सामन्यांतला चौथा पराभव ठरला.

 

ईडन गार्डन्सवरील लढतीत दिनेश कार्तिकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने 159 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. कार्तिकने 29 चेंडूंमध्ये 51 धावांची खेळी केली. तर ब्रेन्डन मॅक्युलमने 29, ड्वेन स्मिथने 27 आणि अॅरॉन फिन्चने 29 धावांची खेळी करुन गुजरातच्या विजयाला हातभार लावला.

 

त्याआधी गुजरातच्या प्रवीण कुमारने दोन तर धवल कुलकर्णी आणि ड्वेन स्मिथने प्रत्येकी एक विकेट काढली आणि कोलकात्याला 20 षटकांत चार बाद 158 धावांत रोखलं. कोलकात्याच्या युसूफ पठाणने 63 तर शाकिब अल हसनने 66 धावांची झुंजार खेळी केली. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 134 धावांची भागीदारी रचली. आयपीएलच्या इतिहासात पाचव्या विकेटसाठी भागीदारीचा हा उच्चांक ठरला.