पुणे : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
गहुंजेमध्ये झालेल्या या सामन्यात विजयासाठी 160 धावांचा पाठलाग करताना रोहितने नाबाद अर्धशतक ठोकलं. त्याने 60 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 85 धावांची खेळी केली. रोहितचं यंदाच्या आयपीएलमधलं हे पाचवं अर्धशतक होतं.
त्याआधी मुंबईच्या गोलंदाजांनी पुण्याला 20 षटकांत पाच बाद 159 धावांवर रोखलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराने तीन, तर मिचेल मॅकलेहान आणि हरभजन सिंहने प्रत्येकी एक विकेट काढली. पुण्याच्या सौरभ तिवारीची 57 धावांची आणि स्टीव्हन स्मिथने 45 धावांची खेळी मात्र वाया गेली. धोनीच्या टीमचा हा आठ सामन्यांमधला सहावा पराभव ठरला आहे.
मुंबई आणि पुण्याच्या संघांमधल्या लढतीबरोबरच आयपीएलने महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उर्वरीत सामने बाहेर हलवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून, मुंबई आणि पुण्याच्या टीम्सनी उर्वरीत सामन्यांसाठी आपलं होमग्राऊंड म्हणून विशाखापट्टणमची निवड केली आहे.
रोहित शर्माची धडाकेबाज खेळी, मुंबईची पुण्यावर मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 May 2016 03:20 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -