Youtuber Girl Sucide: बॉयफ्रेंडसोबत लग्नावरून वाद, प्रसिद्ध युट्यूबर तरुणीनं गळ्याभोवती फास आवळला, टोकाचे पाऊल उचलत संपवलं आयुष्य
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कोमलीने अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली होती.

Youtuber Girl Sucide: सोशल मीडियाच्या जगतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 21 वर्षांच्या लोकप्रिय युट्यूबर कोमलीने आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली असून तिच्या मृत्यूने कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. घरात गळफास घेत तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.ही घटना हैदराबादमध्ये घडली. कोमली मूळची विशाखापट्टणम येथील होती आणि ती बीएससीचे शिक्षण घेत होती. सध्या ती हैदराबादमधील मणिकोंडा परिसरातील चित्रपुरी कॉलनीमध्ये नातेवाईकांसोबत राहत होती. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कोमलीने अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली होती.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कोमलीचे निखिल रेड्डी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. निखिल हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तोही युट्यूबवर सक्रिय आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी निखिलने तिच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळातही कोमलीने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते; मात्र त्यावेळी कुटुंबीयांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती सावरली होती.
बॉयफ्रेंडशी लग्नावरून वाद, इन्फ्लुएन्सर तरुणीने जीव संपवला
अलीकडे दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादानंतर त्यांच्यातील तणाव वाढल्याचेही सांगितले जात आहे. सोमवारी घरात कोणी नसताना कोमलीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. तिच्या आईने रायडुर्गम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, कोमलीच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येची माहिती समोर आल्यानंतर तिच्या फॅन्सना खूप मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कोमलीला श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या काही महिन्यांत सोशल मीडिया क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना समोर येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचेही आजारामुळे निधन झाले होते.
























