Abhinay Berde Advice On Given By Mother Priya Berde: मराठीतले (Marathi Industry) दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा लेक अभिनय बेर्डे (Abhinay Berde) सध्या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमामुळे चर्चेत आहे. रेणुका शहाणे (Renuka Shahane), हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) यांचा 'उत्तर' सिनेमा (Uttar Movie) सध्या थिएटर गाजवतोय. बॉक्स ऑफिसवरच्या 'धुरंधर'च्या लाटेतही मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा आहे. तसेच, या सिनेमातल्या अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं खूप कौतुकही होतंय. अभिनय बेर्डे म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा. यानं 'ती सध्या काय करते' या सिनेमातून इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री केली. पहिल्याच सिनेमातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालेलं. आगामी सिनेमाच्या निमित्तानं अभिनय बेर्डेनं एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यानं त्याची आई म्हणजेच, मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे याच त्याच्या सर्वांत मोठ्या टीकाकार असल्याचं सांगितलं आहे.
'घाणेरडं काम केलंयस...' : अभिनय बेर्डे
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'उत्तर' सिनेमाच्या निमित्तानं अभिनय बेर्डेनं 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत बोलताना अभिनयनं सांगितलं की, "माझी आई ही सर्वांत मोठी टीकाकार आहे. तिला नाही आवडलं, तर ती तोंडावर 'नाही आवडलं' असं म्हणते. 'घाणेरडं काम केलं आहेस', असंही ती थेट म्हणते. मला ती एकदा 'तू अभिनेता म्हणून शून्य आहेस', असंही म्हणाली होती. तेव्हा मला वाईट वाटलेलं. पण त्यामुळे मला स्वत:वर काम करायला खूप मदत झाली. ती कायम मला एक रिअॅलिटी चेक देत असते..."
"तू अभिनेता म्हणून शून्य आहेस. तुला स्वत:वर अभिनेता म्हणून काम करण्याची गरज..." : अभिनय बेर्डे
मुलाखतीत बोलताना अभिनय पुढे म्हणाला की, "तेव्हा मी घरी होतो. बाहेरच्या लोकांशी फारसा संवाद होत नव्हता. त्यामुळे आजूबाजूला काय सुरू आहे, याचं भान नव्हतं. ही लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. तेव्हा तिनं मला 'स्वत:वर काम कर', असं सांगितलं होतं. 'तू अभिनेता म्हणून शून्य आहेस. तुला स्वत:वर अभिनेता म्हणून काम करण्याची गरज आहे. तुझी तुलना थेट तुझ्या वडिलांशी होणार आहे. तू त्यांच्यासारखं काम करशील की, नाही किंवा ते यश साध्य करशील की नाही हे महत्त्वाचं नाही; पण तुला मिळणाऱ्या संधीचं सोनं करणं गरजेचंय. त्यासाठी तू चांगला अभिनेता असणं गरजेचं आहे..., असं ती म्हणालेली.
दरम्यान, अभिनयच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अभिनयनं आजवर अनेक महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयनं 'ती सध्या काय करते' सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं 'रंपाट', 'मन कस्तुरी रे', 'सिंगल', 'बॉईज 4', 'दशावतार', 'वडापाव' यांसारखे अनेक सिनेमे केले. नुकताच त्याच्या 'उत्तर' सिनेमा रिलीज करण्यात आलाय. या सिनेमात अभिनयसोबतच रेणुका शहाणे, हृता दुर्गुळेसुद्धा झळकल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :