Yo Yo Honey Singh Mumbai concert laser light controversy: प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर यो यो हनी सिंह (Yo Yo Honey singh) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या त्याच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. अलिकडेच मुंबईत एक कॉन्सर्टचं (Mumbai Concert) आयोजन करण्यात आलं होतं. जिथे हनी सिंहने परफॉर्म केला होता. पण हा कार्यक्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. पोलिसांच्या पूर्वसूचनेनंतरही, विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्राजवळ बेकायदेशीर लेझर लाईट्सचा वापर केल्याचा आरोप आयोजकांवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवाई सुरक्षेच्या कारणास्तव तेथील अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे लाईट्सचा वापर करण्यास परवानगी नाकारली होती. परंतु, तरीही आयोजकांकडून या लाईट्सचा सर्रास वापर करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि हवाई क्षेत्राच्या नियमांना धोका निर्माण केल्याबद्दल कार्यक्रमाच्या प्रतिनिधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
28 मार्च 2026 रोजी मुंबईतील एमएमआरडीएच्या ग्राऊंडवर हनी सिंहच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लेझर लाईटचा वापर करण्यास परवानगी नव्हती. माहितीनुसार, पोलिसांनी आयोजकांना एअरपोर्ट झोनमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास मनाई केली होती. परंतु, कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तमन्नाज वर्ल्डवाईडचे रिप्रेजेंटेटिव्ह इंद्रजित सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं की, पोलिसांना औपचारिकपणे कळवण्यात आले होते की, कॉन्सर्टला केवळ सुमारे 12,000 लोक उपस्थित राहतील. परंतु, प्रत्यक्षात ही संख्या 18,000 ते 20,000 च्या जवळपास होती. या प्रचंड गर्दीमुळे पोलिसांसमोर मोठे सुरक्षा आव्हान निर्माण झाले होते. तसेच बेकायदेशीर लेझर लाईट्च्या वापरामुळे विमानतळ परिसरालाही धोका निर्माण झाला होता.
हनी सिंहचा कॉन्सर्ट दौरा
28 मार्च रोजी वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंड्सवर, यो यो हनी सिंहच्या 'My Story - India Chapter' टूरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या परफॉर्मन्सने हनी सिंहने स्टेजवर आग लावली होती. हिट गाणी सादर करुन हनी सिंहने माहौल तयार केला होता. हनी सिंह 4 एप्रिल रोजी पुणे, 11 एप्रिल रोजी कोटा, 25 एप्रिल रोजी इंदौर आणि 2 मे रोजी लखनऊ आणि 9 मे रोजी कोलकाताला परफॉर्म करणार आहे. 16 मे रोजी बंगळूरू येथे शो सादर करुन त्याचं टूर समाप्त होईल.
