Wife Killed Husband With Help Of Boyfriend: मुंबईत (Mumbai Crime News) घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं आहे. नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील आरे कॉलनी परिसरात (Aarey Colony) एका पत्नीनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला आणि त्याला यमसदनी धाडलं, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. मृत पती हा एक व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट होता. दरम्यान, या हत्येच्या कटात 35 वर्षीय पत्नी राजश्री अहिरे हिला मदत करणारा तिचा बॉयफ्रेंड चंद्रशेखर पडयाची आणि त्याचा साथीदार रंगा सध्या फरार असल्याची माहिती मिळत आहे. 

बहाण्यानं पतीला बोलावलं अन् घात केला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलैला रात्री राजश्री हिने फोन करून प्रियकर चंद्रशेखरला बोलावलं. त्यानंतर पती भरतला छोटा काश्मीर गार्डन परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ आणलं. चंद्रशेखर आणि रंगा यांनी भरतला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात भरतच्या पोटातील रक्तवाहिन्या फुटल्या. बरगड्यांच्या फासळ्या मोडल्या आणि लिव्हरलाही गंभीर इजा झाली. त्याच्यावर तब्बल 5 शस्त्रक्रिया करण्यात आल्या पण उपचारादरम्यान 5 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.

जेव्हा चंद्रशेखर आणि रंगा भरतला भेटले, तेव्हा त्यांनी त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. चंद्रशेखरनं त्याच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर ठोसे मारायला सुरुवात केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंगानं हल्ल्यादरम्यान भरतला मागून धरलं होतं." पतीवर झालेला हल्ला पाहिल्यानंतरही, राजश्रीनं हस्तक्षेप केला नाही किंवा मदत मागितली नाही. स्थानिक लोक घटनास्थळी जमू लागताच, दोन्ही हल्लेखोर पळून गेले. तिच्या पतीला रुग्णालयात नेण्याऐवजी, राजश्रीनं त्याला घरी नेलं आणि तीन दिवस कोणताही उपचार न करता घरातच ठेवलं.

अल्पवयीन मुलींनी नातेवाईकांना कळवलं... 

दरम्यान, या जोडप्याच्या 13, 5 आणि 3 वर्षांच्या दोन मुलींनी त्यांच्या वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचं पाहिलं. जेव्हा भरत अहिरेला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, तेव्हा मोठ्या मुलीनं नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर भरतची मेहुणी त्यांच्या घरी आली, जिथे राजश्रीनं दावा केला की, भरत एका दुचाकी अपघातात जखमी झाला आहे. त्याला अखेर मालाड पूर्वेकडील पठाणवाडी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात, राजश्रीनं खोटा दावा पुन्हा केला आणि भरतनं भीती आणि दबावामुळे पत्नीनं सांगितलेली गोष्टच पुन्हा सांगितली.  

अल्पवयीन मुलींकडून आईची पोलखोल

पोलिसांनी ज्यावेळी जबाब नोंदवले, त्यावेळी त्यांना बरीच तफावत आढळली. म्हणून त्यांनी भरतनं दिलेल्या जबाबाच्या आधारावर सविस्तर चौकशी केली आणि मुलींसोबत बोलले. यावेळी मुलींनी आई-वडिलांमध्ये भांडण कसं झालं, हे सांगितलं. तिथं आपल्या वडिलांना दोघेजण मारहाण करत असल्याचं दुरून पाहिलेलं. तसेच, त्यावेळी तिची आईसुद्धा कोणतीही मध्यस्थी न करता लांबून शांतपणे सगळं पाहत असल्याचंही पोलिसांना सांगितलं. तसेच, भरत अहिरेंना रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांना घरी आणलं आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार केले नाहीत, अशी माहिती मुलींनी पोलिसांना दिली. अखेर 5 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मेकअप आर्टिस्ट भरत अहिरेचा मृत्यू झाला. मुलीनं दिलेल्या जबाबाच्या आधारे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे आणि इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.