Continues below advertisement


मुंबई : एकेकाळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आणि ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचे निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. संध्या शांताराम या प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम (V Shantaram) यांच्या पत्नी होत्या.


Who Was Sandhya Shantaram : संध्या शांताराम कोण होत्या?


संध्या शांताराम यांचे मूळ नाव विजया देशमुख (Vijaya Deshmukh) असे होते. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1938 रोजी झाला. त्यांच्या बहीण वत्सला देशमुख या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तर वडील हे रंगभूमीशी संबंधित काम करत होतं.


संध्या या नृत्यकलेत पारंगत होत्या आणि अभिनयात शास्त्रीय नृत्याचे घटक वापरणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. 1950 च्या दशकापासून त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप सोडली.


Sandhya Shantaram V Shantaram Love Story : व्ही. शांताराम यांच्याशी विवाह आणि प्रेमकथा


संध्या यांचा विवाह दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याशी झाला होता. शांताराम यांचे हे तिसरे लग्न होते आणि दोघांमधील वयाचा फरक तब्बल 37 वर्षांचा होता. ‘अमर भूपाळी’ या चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांचे संबंध जुळले. संध्या शांताराम यांनी व्ही शांताराम यांच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या.


Sandhya Shantaram Famous Movies : गाजलेले चित्रपट


झनक झनक पायल बाजे (1955) नृत्यप्रधान हिंदी चित्रपट ज्यात त्यांनी प्रभावी भूमिका केली.


दो आंखें बारह हाथ (1957) समाजपरिवर्तनावर आधारित क्लासिक हिंदी सिनेमा.


नवरंग (1959) या चित्रपटातील 'अरे जा रे हट नटखट' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.


अमर भूपाळी (1952, मराठी) त्यांच्या अभिनयाला आणि भावनात्मक अभिव्यक्तीला प्रेक्षकांनी दाद दिली.


पिंजरा (1972, मराठी) या चित्रपटात त्यांनी ‘चंद्रा’ ही भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात ठसा उमटवला.


Pinjra Actress : 'पिंजरा’तील चंद्रा, अमर भूमिका


'पिंजरा’ या चित्रपटातील ‘चंद्रा’ ही भूमिका संध्या शांताराम यांच्या अभिनय कारकिर्दीचा सर्वोच्च टप्पा ठरल. या पात्रात त्यांनी एका तमाशा कलावंत स्त्रीची वेदना, आत्मसन्मान आणि प्रेम यांचे विलक्षण चित्रण केले. त्यांच्या नृत्य, भावभावना आणि चेहऱ्यावरील अभिव्यक्तींनी मराठी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या चित्रपटामुळे त्या आजही 'मराठी चित्रपटातील नृत्याला नवा साज चढवणारा चेहरा' म्हणून ओळखल्या जातात.


Sandhya Shantaram Death : संध्या शांताराम यांची कलात्मक ओळख


संध्या शांताराम यांनी नृत्य आणि अभिनय यांचा अद्भुत संगम सादर केला. प्रत्येक भूमिकेत त्यांनी भावनांची सूक्ष्म अभिव्यक्ती दाखवली. व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओतील अनेक चित्रपटांमध्ये त्या मुख्य भूमिका साकारत होत्या. त्यांच्या नृत्यरचना आणि स्टाइल ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.


संध्या शांताराम यांच्या निधनानंतर ‘नवरंग’, ‘पिंजरा’ आणि ‘दो आंखें बारह हाथ’ यांसारख्या चित्रपटातील सुवर्णकाळाची आठवण पुन्हा जागी झाली आहे.


ही बातमी वाचा: