Vishal Kotiyan on Rikshaw Taxi Marathi Compulsory: गेल्या काही दिवसांपासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे चांगलाच वाद उफाळून आला आहे.(Marathi compulsion for Auto Taxi) परवानाधारक सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्यानंतर या नियमा विरोधात महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्स चालकांनी 4 मे पासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. या प्रकरणावर सर्व स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत .मराठी कलाविश्वातून अनेक अभिनेत्यांनी रिक्षा - टॅक्सी चालकांच्या संपावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता विशाल कोटियन (Vishal kotian) यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात टॉप 5 स्पर्धकांमध्ये गेलेला अभिनेता विशाल कोटीयन याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. बिग बॉस मराठी संपल्यानंता तो अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या रिक्षा चालकांवरील मराठी भाषा सक्तीवर तो बोललाय.
काय म्हणाला विशाल कोटियन ?
विशाल म्हणाला ' माझा जन्म महाराष्ट्रात झालाय. मी जन्माने कर्माने आणि मनानेही मराठी आहे. या आधी मी काही मराठी नाटकांमध्ये काम केलंय. मध्ये कुठेतरी हिंदीत काम करत असताना मराठी बोलायची सवय सुटली होती. पण आता बिग बॉसमुळे मला स्पष्ट मराठी बोलता येतंय. मराठी एक चांगली भाषा आहे. मला मराठी आणि महाराष्ट्राबद्दल खूप आदर आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाच पाहिजे याच मताचा मी आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये ही असंच आहे. महाराष्ट्रात राहूनही तुम्हाला मराठी येत नसेल तर शिका. इथे राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल. मी आत्ता बिग बॉस मधून बाहेर आलोय त्यामुळे मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण, हा निर्णय योग्य आहे . मराठी यायलाच पाहिजे. मराठी बोला कारण हा महाराष्ट्र आहे. " असं विशाल म्हणाला.
नेमकं प्रकरण काय?
परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मेपासून मराठी भाषा जाणणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या तसेच भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यामुळे फेरतपासणीदरम्यान चालकांना मराठी येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्यात येणार आहे.
