Visakha Subedar Son Returned From Kuwait: इराण, इस्त्रायल (US Israel Iran War) आणि अमेरिका यांच्यात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जग तणावात आहे. युद्धामुळे आखाती देशांमध्ये (Gulf Countries) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांतील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामध्ये अनेक भारतीयही आहेत. अशातच युद्धजन्य परिस्थितीमुळे मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Marathi Actress Visakha Subedar) यांचा लेक कुवेतमध्ये (Kuwait) अडकला होता. काही दिवसांपूर्वी विशाखा सुभेदार (Visakha Subedar) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन मुलाला सुखरुप परत आणावं अशी विनंती पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना केलेली. विशाखा सुभेदारांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला. तसेच, त्यांच्या विनंतीची तात्काळ दखल घेत सूत्रं हलवण्यात आली आणि त्याला सुखरुप मुंबईला परत आणण्यात आलं आहे.
मंगळवारी पहाटे मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत दाखल झाला. त्यावेळीचा एक इमोशनल व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. व्हिडीओमध्ये मुंबई विमानतळावरुन विशाखा सुभेदारांचा मुलगा अभिनय सुभेदार बाहेर येताना दिसतोय. त्याच्याकडे खूप सामान आहे. गेटच्या बाहेर येताच अभिनय आपल्या आईच्या दिशेने येतो, मुलाला पाहून आधीपासूनच भारावलेल्या विशाखा सुभेदार अक्षरशः धावतच मुलाच्या दिशेने जातात आणि त्याला कडकडून मिठी मारतात. मुलाला मिठी मारताच विशाखा सुभेदार ढसाढसा रडू लागतात. त्यानंतर अभिनय आपल्या वडिलांना जाऊन भेटतो आणि त्यांना कडकडून मिठी मारतो.
नेमकं घडलेलं काय?
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमार्गे लंडनला निघालेला. कुवेतला त्याचा ट्रान्झिट स्टॉप होता. नेमकं त्याचवेळी इराणनं कुवेतवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केल्यानं कुवेतचं हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं. विमान कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी पुढील सर्व उड्डाणंही रद्द केली. त्यामुळे अभिनय सुभेदार आणि त्याच्यासह अन्य काही मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकून पडलेले. पुढे लंडनला जाणं किंवा मायदेशी परतणं यापैकी कुणालाच शक्य नव्हतं. त्यामुळे सारेच युद्धजन्य परिस्थितीच्या तणावानं भयभीत झालेले. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसू लागल्यानं जीवाचा प्रश्न निर्माण झालेला. मुलगा युद्धभूमीत अडकल्याचं लक्षात येताच, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी रडत-रडतच एक व्हिडीओ पोस्ट केला आणि पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे मुलाला सुखरूप परत आणण्याची विनंती केली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालेला.
युद्धभूमीतून कसा परतला अभिनेत्रीचा मुलगा?
कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनय सुभेदार आणि अन्य महाराष्ट्रीयन नागरिकांना रियाध (सौदी अरेबिया) इथून भारतात परत आणण्याचं नियोजन झालं. मात्र अभिनय सुभेदार यांच्यासह अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी अभिनय सुभेदार यांच्यासह काही जणांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे व्हिसा प्रक्रियेला गती मिळाली आणि अभिनय यांच्यासह अन्य 30 महाराष्ट्रीयन नागरिकांचा कुवेतहून रियाधला (सौदी अरेबिया) जाण्याचा मार्ग मोकळा झाला. सुमारे 700 किलोमीटर अंतराचा दहा तास प्रवास करून हे सर्व महाराष्ट्रातील नागरिक रस्ते मार्गाने रियाधला सुरक्षित पोहोचले.
यानंतर रियाधहून मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाइटद्वारे त्यांच्या परतीचा प्रवास निश्चित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे रियाधहून 9 मार्च रोजी भारतीय वेळेप्रमाणे रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी मुंबईच्या दिशेनं येणारं विमान हवेत झेपावलं. त्यानंतर 10 मार्चच्या मध्यरात्री 3 वाजता मुंबईत दाखल झालं. या विमानातून अभिनय सुभेदारसह महाराष्ट्रातील सुमारे 30 प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत परत दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेत येथील भारतीय दूतावासानं आवश्यक सहकार्य केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
