Bollywood celebrities reaction to Raja Shivaji poster: शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले. या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूकमध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेहरावात दिसत आहे. त्याच्या हातात तलवार आणि भगवा झेंडा दिसत आहे.
रितेश देशमुखला या शैलीत पाहून प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं. चाहत्यांनी कमेंट करुन आगामी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. दरम्यान, या सगळ्यात रितेश देशमुखच्या पोस्टवरील एका कमेंटची प्रचंड चर्चा होत आहे. ती कमेंट बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने केली आहे. रितेश देशमुखने 'राजा शिवाजी', या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला. या पोस्टरवर विकी कौशल कमेंट केली, त्या कमेंटची सध्या चर्चा होत आहे.
छावा' चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने, रितेश देशमुख याच्या पोस्टवर "आबासाहेब" अशी कमेंट केली. तसेच रितेशला मानाचा मुजरा दिला. ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून 'शंभूराजेंनी शिवरायांना दिलेली ही साद' असल्याचे म्हटले जात आहे. या कमेंटवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे. केवळ विकीच नाही, तर चित्रपटसृष्टीतील सायली संजीव, मिलाप झवेरी, रमेश तौरानी, विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, अमृता खानविलकर, मनीष पॉल, राहुल देव, लिझेल रेमो डिसूझा आणि मुश्ताक शेख यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आणि निर्मात्यांनी देखील पोस्टर शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.
'राजा शिवाजी' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारीत आहे. या चित्रपटासाठी रितेश देशमुखने विशेष मेहनत घेतली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील रितेश देशमुख सांभाळणार आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
