Chhaava: राज्यासह देशभरात सध्या 'छावा' (Chhaava) चित्रपटाची मोठी क्रेझ दिसून येत आहे. विकी कौशल, रश्मिका, अक्षय खन्ना, यांच्यासह इतर कलाकारांच्या कामांचं मोठं कौतुक सध्या होतंय (Vicky Kaushal). छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये विकी कौशल शोभून दिसतोय. या चित्रपटातील डॉयलॉग एकताना आणि चित्रपट पाहताना अंगावरती काटा उभा राहतो. प्रेक्षकांनी सर्वांच्या कामांचं, आणि दिग्दर्शकाचं कौतुक केलं आहे, चित्रपट पाहून प्रेक्षक भारावले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वांच्या पसंतीला हा चित्रपट उतरतो आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अगदी लहान मुलांच्या डोळ्यातही पाणी आल्याचं दिसून येतंय. एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिनेमा संपल्यावर तो चिमुकला गर्जना करताना दिसतोय. विकीने या चिमुकल्याचा व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.


सोशल मीडियावरील व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. 5-6 वर्षांचा हा चिमुकला 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर शेवटी रडत तो छातीवर हात ठेवून गर्जनाही करत आहे. सिनेमा संपल्यानंतर या चिमुकल्याने थिएटरमध्येच गारद म्हणून महाराजांना मानवंदना दिली आहे. यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. यातून त्याने शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली. हा त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 


विकीने हाच व्हिडिओ शेअर करत लिहली पोस्ट


विकी कौशलने या चिमुकल्याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याने याबाबत पोस्ट लिहली आहे, "आमची सर्वात मोठी ही कमाई! बेटा, तुझा अभिमान वाटतो. तुला मिठी मारावी वाटत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि भावनेबद्दल खूप खूप आभार. शंभूराजांची कहाणी जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावावी, ही आमची इच्छा होती. हे सत्यात उतरताना पाहून जिंकल्यासारखं वाटतं आहे",  अशी पोस्ट विकी कौशलने शेअर केली आहे.




छावा चित्रपटाला मिळतोय चांगला प्रतिसाद


लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शीत केलेल्या 'छावा' चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने या सिनेमात औरंगजेबाची भूमिका केली आहे, अक्षय खन्नाच्या अभिनयाचं लोक विशेष कौतुक करताना दिसत आहेत. या सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, नीलकांती पाटेकर, शुभंकर एकबोटे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'छावा' सिनेमाने तीनच दिवसांत संपूर्ण जगभरात 121 कोटींचा गल्ला केला आहे.