Vicky Kaushal Chhaava Movie Controversy: विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) अभिनीत छावा चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरनं अनेकांच्या मनाचा ठाव घेतला, पण त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांनी मात्र प्रेक्षकांचा संताप ओढवून घेतला. छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीवर आधारित आहे. अशातच, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी राजे आणि महाराणी येसुबाई लेझीम खेळतानाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. नेमका याच सीनवर अनेक शीवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. यावरुन बहुचर्चित 'छावा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण, आता शीवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे 'छावा'मधला लेझीमचा सीन डिलीट करणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी जाहीर करून टाकलं आहे. दरम्यान, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. चित्रपटात छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि महाराणी येसूबाई (Maharani Yesubai Bhonsale) लेझीम खेळतानाचं दृश्य असून  दृश्यावर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला होता. या सिनेमात काय बदल करावे? यावर राज ठाकरेंसोबत चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली. 

Continues below advertisement

छावा चित्रपटातील लेझीमचा सीन चित्रपटातून काढला जाणार, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं. छावा चित्रपटातील या सीनबद्दल शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच,  छावा  चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग रिलीज आधी इतिहासकार आणि राज ठाकरेंसाठी ठेवलं जाणार असल्याची माहिती दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर  यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "आज राज ठाकरेंची भेट त्यांचा सल्ला घेण्यासाठी होती. त्यांच वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास ज्ञात आहे. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरही खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा? हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणि याच चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्यात. ते बदल आम्ही करणार आहोत."

Continues below advertisement

लक्ष्मण उतेकर म्हणाले की, "ज्या महाराजांच्या लेझीम खेळणाऱ्या सीनवरुन वाद सुरू आहे, तो आम्ही डिलीट करणार आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. ज्या सीनवरुन वाद निर्माण झाला, तो आम्ही डिलीट करणार. राज ठाकरेंनीही तोच सल्ला दिला आहे. त्यामागे कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण जर कुणाला वाटत असेल, आमचे राजे असे लेझीम खेळत नसतील, तर आम्ही तो सीन चित्रपटातून काढून टाकणार. कारण तो फिल्मचा खूप मोठा भाग नाहीये, एक छोटासा सीन आहे. त्यामुळे तो आम्ही काढून टाकणार."

"आमची संपूर्ण टीम यावर गेली चार वर्ष रिसर्च करतेय. हा सिनेमा बनवण्यामागचा उद्देश एकच होता की, छत्रपती संभाजी महाराज काय होते? हे संपूर्ण जगाला कळावं, ती व्यक्ती काय होती, किती प्रचंड मोठा योद्धा होता, राजा होता... हे संपूर्ण जगाला कळावं, पण एखाद, दोन गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील, तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही.", असं दिग्दर्शक उतेकर म्हणाले.