Pandit Chandrakant Limaye Passed Away: संगीत विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायक डॉ वसंतराव देशपांडे यांचे शिष्य आणि 'कट्यार काळजात घुसली' (Katyar Kaljat Ghusli) या नाटकात खाँ साहेबांची अजरामर भूमिका साकारणारे गायक व अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये (Singer Chandrakant Limaye Passed Away) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुवाहाटी येथे निधन झाले. पत्नीसोबत ते आसामच्या सहलीवर गेले होते. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याचा सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्रोत मालवली. ते 76 वर्षांचे होते. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी समर्थपणे पुढे नेणारा स्वर हरपल्याची भावना संगीत विश्वातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (1 जून 2026 ) ठाण्यात दुपारी 2.30 वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मराठी संगीत विश्वातील अजरामर सूर हरपला
पंडित चंद्रकांत लिमये यांना लहानपणापासूनच पं. नारायणराव व्यास, पं. वसंतराव राजोपाध्ये, पं. गजाननबुवा जोशी, पं. रत्नाकर पै, पं. चंद्रशेखर रेळे अशा गुरूंकडून तालीम मिळाली. डॉ. वसंतराव देशपांडे यांचा गुरु म्हणून 12 वर्ष सहवास लाभला . वसंतरावांनंतर पं चंद्रकांत लिमये 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात खाँ साहेबांच्या भूमिकेत असत. शिवाय, 'संत गोरा कुंभार', 'संगीत सौभद्र', 'तो मी नव्हेच', 'पती गेले ग काठेवाडी' या नाटकांमध्ये त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. पं. चंद्रकांत लिमये यांनी 2000 मध्ये वसंतराव देशपांडे संगीत सभा या चारिटेबल ट्रस्टची स्थापना केली होती. या माध्यमातून 'हवेली संगीत' ,'नाट्यरंग संगीताचे' असे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले. पं. चंद्रकांत लिमये यांच्या निधनाने मराठी संगीत विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या जाण्याने नाट्यसंगीत व शास्त्रीय संगीतातील पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना रसिक व्यक्त करत आहेत.
