Vatsala Deshmukh Passes away : मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्व गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (Vatsala Deshmukh) यांचे आज निधन झाले. मराठीतील प्रसिद्ध दिवगंत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. वत्सला देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्ष नाट्य आणि सिनेसृष्टीच्या प्रवासाने एक काळ गाजवला होता.



‘पिंजरा’ या सिनेमात त्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यांची ती भूमिका विशेष गाजली होती. अनेक सिनेमात वत्सला यांनी प्रमुख अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका निभावल्या आहेत. आई, काकू, मावशी, आत्या, आजी अशा अनेक भूमिकेतून वत्सला देशमुख प्रेक्षकांच्या मनामनात वसल्या होत्या.


‘पिंजरा’तील संवाद लोकप्रिय!


‘काय म्हणावं या मास्तरला, डोस्कं बिस्कं फिरलया का अक्कल गहाण ठिवून आलायसा, काय म्हणते मी, नीट गुमान राव्हायचं असलं तर राव्हा, नाहीतर चालू पडा’, हा पिंजरा सिनेमातील त्यांचा संवाद चांगलाच गाजला होता.


मनोरंजनविश्वाची कौटुंबिक पार्श्वभूमी


वत्सला देशमुख यांच्या कुटुंबातील अनेक जण मनोरंजनविश्वाशी निगडीत होते. त्यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ‘ललितकलादर्श’ कंपनीत काम करत होते. वत्सला यांची बहिण प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या देखील सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. तर, त्यांची मुलगी रंजना यांनी देखील मराठी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. अभिनेत्री रंजना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फार कमी वयात रंजना यांनी या जगाचा निरोप घेतला होता.


एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत वत्सला देशमुख म्हणाल्या होत्या की, ‘राजकारण हा माझा आवडीचा विषय आहे.’ काही महिन्यांनपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या टीव्ही कार्यक्रमात त्या तब्बल सोळा वर्षांनी कॅमेरासमोर आल्या होत्या. स्वतः चित्रपटविश्वात सक्रिय असणाऱ्या वत्सला या मालिकांमध्येही रमायच्या. ‘जय मल्हार’ ही त्यांची आवडती मालिका होती. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha