सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले असून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते. आई माझी काळूबाई या सिरियलचे शुटिंग सुरू असताना त्यांना लागण झाली होती. आशालता वाबगावकर यांच्याव्यतिरिक्त सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेले चार दिवस आशालता वाबगावकर यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते. मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास 40 हून अधिक वर्षांसाठी त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे 100 हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. 'गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या 'अपने पराये'या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपट सृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या 'माझी आई काळुबाई' या मालिकेच्या सेटवर कोरोनाने धाड टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यात या मालिकेचं चित्रिकरण सुरू असताना या सेटवरच्या तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, या मालिकेतील महत्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही लागण झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे साताऱ्यातील रूग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
'आई माझी काळूबाई' ही मालिका लॉकडाऊननंतरच्या काळात सुरू झाली. या मालिकेत प्राजक्ता गायकवाड, अलका कुबल, आशालता वाबगावकर यांच्या मुख्य भूमिका आहे. या मालिकेचा तामझाम मोठा आहे. या मालिकेत गाण्याचं चित्रिकरण चालू होतं. त्यासाठी काही मंडळी मुंबईतून आली होती. साताऱ्याजवळ असलेल्या खानविलकर फार्महाऊसवर या गाण्याचं चित्रिकरण सुरू होतं. तिथेच कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातून 27 जण कोरोना बाधित झाले.