Veteran Actor Sudesh Kumar Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीच्या (Hindi Movies) 'सुवर्णकाळात' अनेक यशस्वी आणि गाजलेले चित्रपट देणारे 1960 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते सुदेश कुमार (Veteran Actor Sudesh Kumar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कन्या, मिशिका धवन जमतनी, यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याला ब्रेन स्ट्रोक (Actor Sudesh Kumar Suffers Brain Stroke) झाल्यामुळे 1 मे रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 4 मे रोजी त्यांच्यासाठी एका प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिग्गज अभिनेते सुदेश कुमार (Actor Sudesh Kumar) म्हणजे, 1950, 60 आणि 70 च्या दशकातलं सुप्रसिद्ध नाव. आपल्या अभिनयकौशल्यानं आणि साधेपणानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली होती. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारण्यासोबतच, एक 'कॅरेक्टर आर्टिस्ट' म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ते 'पृथ्वी थिएटर'शी जोडलेले होते. या अनुभवामुळे त्यांच्या अभिनयाला एक अनोखी खोली प्राप्त झालेली. या ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीमुळे आता संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

कित्येक कल्ट फिल्म्सचा महत्त्वाचा भाग होते सुदेश कुमार

सुदेश कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये कित्येक ब्लॉकबस्टर फिल्म्स दिल्यात आणि राज कपूर यांच्या अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सचा ते अविभाज्य भागही होते. राज कपूर यांच्यासोबत काम करत असताना, त्यांनी केवळ एक अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शन क्षेत्रातही मोलाचं योगदान दिलं. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय सिनेमे दिले, ज्यामध्ये 'छोटी बहन' (1959) आणि 'सारंगा' (1961) यांचा समावेश आहे. शिवाय, 'रॉकेट गर्ल' (1962), 'पैसे' (1957), 'धरती', 'वारिस', 'खानदान' आणि 'मन मंदिर' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी एक अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही, त्यांनी साकारलेली अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

95 व्या वर्षी जगाचा निरोप

सुदेश कुमार यांनी वयाच्या 95 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ज्येष्ठ अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण केलीय. सुदेश कुमार यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी दिवंगत अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

राज कपूर यांच्या कित्येक प्रोजेक्ट्समध्ये बजावलेली महत्त्वाची भूमिका

सुदेश कुमार हे अशा मोजक्या कलाकारांपैकी एक होते, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात 'पृथ्वी थिएटर'मधून केली आणि तिथेच त्यांनी आपल्या कलेतील बारकावे आत्मसात केले. याच संबंधामुळे त्यांना राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि प्रचंड गाजलेल्या 'दो बदन' या सिनेमासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. आजही हा सिनेमा त्याच्या अप्रतिम संगीत आणि कथानकासाठी ओळखला जातो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actor Bharat Kapoor Passes Away: 'चंद्रकांता' फेम दिग्गज अभिनेते भरत कपूर काळाच्या पडद्याआड; मल्टिपल ऑर्गन फेल्युअरनंतर घेतला अखेरचा श्वास, वयाच्या 80 व्या वर्षी निधन