BhauBali Marathi Movie : ‘पांडू’, 'टाईमपास 3', 'धर्मवीर' सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर झी स्टुडिओज आता नवाकोरा विनोदी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना खूप उत्कृष्ट चित्रपट दिले आहे. या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावण्यासाठी झी स्टुडीओज सज्ज झाला आहे. नुकताच त्यांच्या आगामी विनोदी चित्रपटाचा अर्थात ‘भाऊबळी’चा (BhauBali) ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या धमाकेदार चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.  


जिंकू किंवा मरू.. म्हणत या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये दिसते की, या चित्रपटाची कथा ही चाळ विरुद्ध इमारत या वादावर आधारित आहे. चित्रपटात एका बाजूला चाळीत राहणारे लोक आहेत, तर दुसरीकडे इमारतीत राहणारे लोक आहेत. या दोन गटांदरम्यान काही वाद पाहायला मिळतात. आता हे वाद विनोदी आहेत, की या विनोदातून काही संदेश दिला जाणार आहे, हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.


पाहा धमाल ट्रेलर



झी स्टुडिओज प्रस्तुत, समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, मनोज जोशी, किशोर कदम, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, संतोष पवार आणि अनेक कमाल कलाकारांची फौज या चित्रपटाला लाभली आहेत. हा चित्रपट हास्याची कोणती विनोदी खेळी रंगवणार ते चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. 


लेखक जयंत पवार यांचा अखेरचा चित्रपट


दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांनी लिहिलेला हा शेवटचा चित्रपट आहे. विनोदी तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा हा चित्रपट असणार हे चित्रपटाचा ट्रेलर पाहून समजते. येत्या 16 सप्टेंबरला मनोरंजन डबल करायला 'भाऊबळी' (BhauBali) सिनेमागृहात येत असून, ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्यासाठीची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढलेली दिसत आहे.


प्रेक्षकांचे प्रेम मिळेल अशी आशा : समीर पाटील


प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते समीर पाटील (Sameer Patil) यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यांनी याआधी ‘पोश्टर बॉईज’, ‘पोश्टर गर्ल’, ‘शेन्टिमेंटल’, ‘विकून टाक’ असे चित्रपट केले आहेत. निर्मिती आणि दिग्दर्शनात रमलेले समीर पाटील ‘तरतीतो’ या वेब सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभिनय विश्वात परतले आहेत.


या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलतान समीर पाटील म्हणाले की,’झी स्टुडिओजने नेहमीच भव्य दिव्य एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. झी स्टुडिओज 'भाऊबळी' चित्रपट मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रदर्शित करेल, याची मला खात्री आहे. सर्वच उत्तम कलाकार या चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटालासुद्धा प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी मला आशा आहे.’


हेही वाचा :


Raada : मराठमोळ्या 'राडा'ला मिळालाय साऊथ स्टाईल टच, चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा!