Udayanraje Bhosale on Priya Marathe : मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झालं आहे. कर्करोगाशी झुंज देत असताना तिने अखेरचा श्वास घेतलाय. प्रियाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तिच्या दमदार अभिनयामुळे ती घराघरात पोहोचली होती. अचानक आलेल्या या दुःखद बातमीने मराठी कलाविश्वातील कलाकार, सहकारी आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी श्रद्धांजली वाहत प्रियाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिच्या निधनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्राने एक उमदी, प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्री गमावली आहे.
दरम्यान, यावर भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत दु:ख व्यक्त केलंय. उदयराजे म्हणाले, भावपूर्ण श्रद्धांजली अभिनेत्री प्रिया मराठे.....अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत निधन झाले. मराठी आणि हिंदी मालिकांमधील त्यांच्या उल्लेखनीय भूमिकांमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने म्हणाले, लोकप्रिय मराठी व हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या गुणी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत दुःखद निधन झाले आहे. ‘पवित्र रिश्ता’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा अनेक मालिकांमधील दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या प्रिया मराठे या कायम स्मरणात राहतील. त्यांचा अभिनय, त्यांची जिद्द आणि सकारात्मक जीवनदृष्टी प्रेरणादायी ठरेल. "ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य देवो.
इतर महत्त्वाच्या बातम्या