TV Actress Duped 65 Lakhs: डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) ही सध्याची सायबर-घोटाळा (Cyber Scam) करण्याची नवी पद्धत आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे पीडितांना धमकावण्यासाठी आणि खोटे आरोप करतात आणि स्वतः पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचं भासवतात. आजवर असं डिजिटल अरेस्ट करुन कित्येक कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे.  अशातच आता या डिजिटल अरनेस्टची बळी एक टेलिव्हिजन अभिनेत्री ठरली आहे. अभिनेत्रीला तब्बल 7 तासांसाठी डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. तसेच, डिजिटल अरेस्ट करुन अभिनेत्रीकडून तब्बल 6.5 लाख रुपये उकळण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं भासवून मुंबईत 26 वर्षीय  टीव्ही अभिनेत्रीला गंडा घालण्यात आला आहे. अभिनेत्रीला तब्बल सात तासांसाठी 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आली आहे. तसेच,  तिच्याकडून 6.5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी घडली. अभिनेत्रीला बँकेची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अडकवण्याची आणि तिचा पासपोर्ट फ्रीज करण्याचीधमकी देण्यात आली. एका अ‍ॅपनं त्या नंबरवरुन आलेला फोन स्पॅम कॉल असल्याचं सांगितल्यावर अभिनेत्रीला फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर अभिनेत्रीनं तात्काळ ओशिवरा पोलीस स्टेशन गाठून एफआयआर दाखल केला आहे. 

FIR मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, पाच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालहून मुंबईत आलेल्या या अभिनेत्रीला एका व्यक्तीचा फोन आला, ज्यानं स्वतःची ओळख फोन कंपनीचा कार्यकारी अधिकारी म्हणून करून दिली आणि सांगितलं की, तिच्या सिम कार्डवरुन बेकायदेशीरपणे बँकिंग फसवणुकीची कामं करण्यात आली आहेत. त्यानंतर, तिला दिल्ली पोलीस अधिकाऱ्याच्या व्हिडीओ कॉलची वाट पाहण्यास सांगण्यात आलं. 

Continues below advertisement

गणवेशात असलेल्या बनावट पोलीस अधिकाऱ्यानं अभिनेत्रीला सर्वोच्च न्यायालयाची बनावट नोटीस दाखवून धमकी दिली. त्यानं सांगितलं की, जर तिनं चौकशीच्या नावाखाली 6.5 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर केले नाहीत, तर तिचा पासपोर्ट गोठवला जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पैसे परत केले जातील, असं आश्वासनही अभिनेत्रीला देण्यात आलं. घाबरलेल्या अभिनेत्रीनं फसवणूक करणाऱ्याच्या सूचनेनुसार पैसे ट्रान्सफर केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यानं कॉल दरम्यान अभिनेत्रीला तिचं आधार कार्ड कॅमेऱ्यासमोर दाखवण्यास सांगितलेलं. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ते ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते, त्या खात्याची माहिती विचारत होते. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतरही फसवणूक करणाऱ्यानं तिला कॉल करणं सुरूच ठेवल्यानं अभिनेत्रीला संशय आला. तिनं तिच्या फोनवरील स्पॅम-फ्लॅगिंग अॅप तपासलं, ज्यामध्ये तिच्यासोबत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं.

दरम्यान, सध्या 'डिजिटल अरेस्ट'च्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच, एखादी व्यक्ती हेरून तिला सर्वात आधी मोठ्या गुन्ह्यात अडक्याचं सांगून घाबरवलं जातं. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशात व्हिडीओकॉल करुन धमकी दिली जाते आणि पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे एबीपी माझा आवाहन करतंय की, कोणासोबतही आपली पर्सनल माहिती शेअर करुन नका, आपल्या फोनवर आलेला ओटीपी कुणालाही देऊ नका.