Falaq Naaz reveals TV industry casting trend: टेलिव्हिजन अभिनेत्री फलक नाज सध्या सोशल मीडियावर विविध कारणामुळे चर्चेत आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. ती व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून इंटरनेटवर चर्चेत असते. आपल्या व्हिडिओतून बऱ्याचदा अभिनेत्री इंडस्ट्रीतील  काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा करते. तसेच फलक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी आणि टीव्ही इंडस्ट्रीची पोलखोल करते. अलिकडेच अभिनेत्रीनं एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. तिनं या व्हिडिओतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नेमकं कसं काम मिळतं? तसेच टीव्ही इंडस्ट्रीमधील एक कास्टिंग ट्रेंड उघड केला आहे. 

फलकने आपल्या व्हिडिओत नेमकं काय म्हटलं?

फलकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिनं, आजकाल टेलिव्हिजन प्रोडक्शन हाउस कशा पद्धतीने ऑडिशनऐवजी कुंडली मागतात, याबाबत उघड केले. याबाबत माहिती देताना अभिनेत्री म्हणाली, 'पूर्वी सिने इंडस्ट्रीत टॅलेंट आणि अभिनयाच्या जोरावर काम मिळत होते.  पण आता काळ बदलला आहे.  आता इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या आधारे काम दिले जाते.  आता नवीन काळ सुरु झालाय.  आता तुम्हाला काम देण्यासाठी  लोक तुमची जन्म कुंडली पाहत आहेत', असा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे.

 

'असं पहिले कधीच घडलेलं नाही. काल मला एक कॉल आला होता.  मी त्या प्रोडक्शन हाऊसचं नाव नाही सांगणार.  त्यांनी मला कॉलवर सांगितले की, एक शो येत आहे. त्यांनी कॉलवर चॅनल, प्रोडक्शन हाऊस आणि कॅरेक्टरचे नाव सांगितले होते.  मी म्हणाले ठीक आहे. आता पुढची प्रक्रिया काय? शक्यतो कलाकारांना लूक टेस्टसाठी बोलावण्यात येते. नंतर रेफरन्स ऑडिशनसाठी बोलावण्यात येते.   पण मला माझी जन्म तारीख, ठिकाण आणि वेळ पाठवण्यास सांगितले होते', अभिनेत्रीनं तिची माहिती शेअर केली. पण तिला या गोष्टीचा प्रचंड राग आला.

'काही प्रॉड्यूसर असेच करतात. कलाकारांना कास्ट करण्यापूर्वी अॅक्टरची जन्म कुंडली पंडित यांना दाखवतात.  यानंतर त्या कलाकाराला कास्ट केले जाते'.  अभिनेत्रीच्या बोलण्यावरुन असे वाटत  होते की, तिचा रोष एकता कपूरकडे होता.  तिनं स्पष्ट केलं की, यामुळे अभिनेत्रीनं कधीही त्या प्रॉड्यूसरसोबत काम केले नाही.  या व्हिडिओवर अभिनेत्रीनं संताप व्यक्त केला. तसेच सिनेसृष्टीत काम मिळवण्याची ही पद्धत अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.