laddu mutya baba: सध्या सोशल मिडीयावर धावता पंखा हातानं थांबवत पंख्याच्या वरची धूळ कपाळी लावणारा हा 'फॅनबाबा' आता चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. सोशल मिडीयावर सध्या असे अनेक रिल्स तुम्ही पाहिले असतील. हा फॅनवाला लड्डू मुत्या बाबा कोण आहे? याची जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. याआधी धीरेंद्र शास्त्रींचे व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत होते. समोरच्याच्या मनात काय चाललंय हे चिठ्ठीवर लिहून सांगण्याचा दावा या बाबानं केला होता. महाराष्ट्रात या बाबाच्या कार्यक्रमांची एकच चर्चा होती. आता दोन तीन जणांच्या खांद्यावर बसत हाताने पंखा थांबवणाऱ्या लड्डू मूत्या बाबांच्या व्हिडिओसारखे अनेकांनी रिल्स, व्हिडीओ बनवले असून नेटक्ऱीच लड्डू मूत्या बाबांसारखी पंखा थांबवून धूळ लावण्याची नक्कल करू लागले आहेत.
कोण आहेत लड्डू मूत्या बाबा?
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या बाबा सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालेत. सोशल मिडीयावर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. एकीककडे हा फॅन थांबवण्याचा चमत्कारिक प्रकार पाहण्यासाठी आणि लड्डू मुत्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. हे लड्डू मुत्या बाबा लोकांना प्रवचनही देतात असे सांगण्यात येत आहे. अनेक लोक त्यांना पंखेवाले बाबा म्हणूनही ओळखतात.
नेटकऱ्यांनी बनवल्या मजेशीर रील्स
सध्या सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी लड्डू मुत्या बाबाला चांगलच उचलून घेतलंय. हे बाबा म्हणे फिरता पंखा हाताने थांबवून पंख्याची धूळ आशीर्वाद म्हणून भक्तांना लावतात. मागे लड्डू मूत्या बाबांच्या स्तूतीचं गाणं सुरु असतं. या बाबाच्या चमत्कारिक व लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर रिल्स बनवून खळखळून हसवले आहे. हे मीम्स पटापट सध्या शेअर केले जात असून तुम्हालाही हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही. अनेकांनी या व्हिडीओजवर नाराजीही व्यक्त केली आहे. तर काहींनी या व्हिडीओज, रिल्सवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
त्यांच्या 'फॅन'च्या चमत्कारिक कृत्याचे सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ, रिल्स व्हायरल होताना दिसत आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाविकाच्या घरातील जोरात सुरु असलेला फॅन हाताने थांबवून भाविकाला आशीर्वाद दिला होता. त्यानंतर या बाबाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली.