Toxic Fame Actor Yash: ‘KGF’ स्टार यश(Yash) सध्या त्याच्या आगामी ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. यशने रजत शर्मा यांच्या लोकप्रिय ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात अलीकडेच हजेरी लावली. या मुलाखतीत त्याने आपल्या करिअरपासून संघर्षापर्यंत अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यशने आपल्या चित्रपटाच्या मानधनाबाबतही मोठा खुलासा केलाय..मुलाखतीदरम्यान रजत शर्मा यांनी यशला विचारले की, सुपरस्टार झाल्यानंतर तो एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपये मानधन घेतो का? यावर अभिनेता यशने दिलेल्या उत्तराची चर्चा रंगलीय.
किती घेतो मानधन?
रजत शर्मांच्या प्रश्नावर यशने उत्तर दिले की, “नाही, त्यापेक्षा जास्त हवे सर.” मात्र, त्याने स्पष्ट केले की तो पारंपरिक पद्धतीने मानधन घेणारा अभिनेता नाही.
यश म्हणाला की, तो स्वतःला केवळ अभिनेता समजून काम करत नाही, तर निर्मात्याप्रमाणे विचार करतो. चित्रपट सुरू होण्यापूर्वी संपूर्ण पैसे घेऊन स्वतःवरची जोखीम कमी करण्यापेक्षा तो निर्मात्यांसोबत भागीदारीत काम करण्याला प्राधान्य देतो.
“मी असा अभिनेता नाही की आधी पैसे घेऊन स्वतःला सुरक्षित करायचं आणि सगळी जोखीम निर्मात्यांवर सोडायची. मी नेहमी पार्टनरशिपमध्ये काम केलं आहे. प्रेक्षकांना चित्रपट आवडला तर त्यातून मिळणारा हिस्सा वाटून घेऊ. चित्रपट चालला नाही तर नुकसानही सोबत सहन करू,” असे यशने सांगितले.
यशच्या संघर्षाबाबतही या मुलाखतीत विचारलं असता तो म्हणाला “ कधी झाडू- पोछा करण्यातही आनंद मिळू शकतो, आणि कधीतरी मोठा पुरस्कार मिळाल्यानंतरही आनंद मिळेलच असं नाही,” असं तो म्हणाला.
‘टॉक्सिक’च्या पोस्टपोनबाबतही दिलं स्पष्टीकरण
यशने त्याच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या रिलीजला झालेल्या विलंबावरही भाष्य केले. हा चित्रपट आधी 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर त्याची रिलीज पुढे ढकलण्यात आली. याबाबत बोलताना यश म्हणाला की, त्याने कोणत्याही चित्रपटासोबत जाणीवपूर्वक क्लॅश करण्याचा प्रयत्न केला नव्हता.
यशने असेही सांगितले की, चित्रपटाबाबत त्याला पूर्ण विश्वास होता. मात्र, काही कारणांमुळे निर्मात्यांच्या निर्णयाचा आदर करत ‘टॉक्सिक’ची रिलीज पुढे ढकलण्यात आली.
शाळेपासूनच होता ‘हिरो’
यशला अभिनयासोबतच नृत्याचीही आवड होती. शाळेत असताना तो डान्सच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचा. त्याच्या डान्समुळे शाळेत त्याला ‘हिरो’ म्हणून ओळखले जायचे. यशने सांगितले की, त्याने शाळेत एकदा वीरप्पनला पकडण्यासंदर्भात एक डायलॉग म्हटला होता. तो डायलॉगही त्यावेळी चांगलाच लोकप्रिय झाला होता.
आज यश कोट्यवधींच्या चित्रपटांचा स्टार आहे. मात्र, आपल्या भूतकाळाकडे पाहताना त्याला कधीच काही गमावण्याची भीती वाटत नाही. “माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे आता जे काही आहे ते माझ्यासाठी प्लस आहे,” असं तो म्हणाला..
कधी रिलीज होणार ‘टॉक्सिक’?
दरम्यान, ‘टॉक्सिक’ हा एक ॲक्शन-सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशसोबत कियारा आडवाणी, तारा सुतारिया, नयनतारा, हुमा कुरैशी आणि रुक्मिणी वसंत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.चित्रपट 26 ऑगस्ट 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
